तेव्हा कुठे गेली होती तुमची मर्दानगी विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांचा शिवसेना नेते संजय राऊत यांना सवाल

November 25,2020

यवतमाळ -  एक महिला घरी नसताना. सर्व लवाजमा आणि फौजफाटा घेऊन त्यांचे ऑफिस ज्यावेळी उद्ध्वस्त करण्यात आले यामध्ये कोणती मर्दानगी होती?

असा खरमरीत सवाल आज विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी राऊत यांना केला आहे. शिवसेना नेते प्रताप सरनाईक घरी नसताना ईडीने धाड टाकली, यात कसली मर्दानगी अशी शेखी मिरवित शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर दरेकर यांनी हा सवाल उपस्थित केला आहे.

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजपचे उमेदवार प्रा. डॅा. नितीन धांडे यांच्या निवडणूक प्रचारार्थ, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण जी दरेकर यांची यवतमाळ येथे पत्रकार परिषदेतील आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये बोलताना ते म्हणाले की, काहीही झाले की भाजपवर आणि केंद्रावर ढकलण्याची शिवसेनेला सवयच झाली आहे. केवळ जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी आव्हान- प्रतीआव्हानाची भाषा शिवसेनेकडून वापरली जातेय असे स्पष्ट करतानाच दरेकर म्हणाले की, कंगना राणावत यांच्या ऑफिसवर महापालिकेने जेव्हा सूडबुद्धीने कारवाई केली, त्यावेळी हेच संजय राऊत म्हणाले होते, की या कारवाईचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही!  मग आता प्रताप सरनाईक यांची ईडीने रुटीन चौकशी केली, तर त्याचा भाजपशी कसा काय संबंध जोडला जाऊ शकतो? आणि काही चूक नसेल तर चौकशीला कशाला घाबरता? असाही सवालही दरेकर यांनी उपस्थित केला आहे.

ईडीसारख्या तपास यंत्रणेवर चिखलफेक करणे उचित नाही. माध्यमे आणि विरोधी मत मांडणाऱ्या सर्वसामान्यांना जेलमध्ये टाकताना, कुणी, कुणाला स्वपक्षाच्या शाखेप्रमाणे वागवलं होतं? याचाही विचार तुम्ही करावा असे स्पष्ट करताना ते म्हणाले की, कोणत्याही गोष्टीची सुरुवातही जनता करते आणि शेवटही जनताचं करते, याचं विस्मरण बहुदा सत्तेच्या गुर्मीमुळे झालेलं दिसत आहे. 'बाप' वगैरेची भाषा तुम्हीचं करू शकता कारण जनतेनेही सुध्दा तुमच्याकडून दुसरी अपेक्षा ठेवलेली नाही अशी टोलाही दरेकर यांनी मारला आहे.

राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. दिवसाढवळ्या महिलांवर अत्याचाराच्या घटना दर दिवशी होत आहेत. क्वारांटाईन सेंटरमध्ये उपचार घेणा-या महिलाही सुरक्षित नाही अशी टिका करतानाच ते म्हणाले की, ठाणेमध्ये जमील नावाच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिका-यावर भरदिवसा गोळीबारात हत्या झाली.खुले आम रस्त्यात येऊन  बाईक वरून गोळ्या घालणे असे प्रकार सुरु आहेत. गुन्हेगारांना कोणत्याही प्रकारचा धाक,दरारा उरला नाही अशी टिकाही दरेकर यांनी केली.

अमरावतीमध्ये केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या माध्यमातून विदर्भात रस्त्याचं जाळं निर्माण झालं. तसेच गेल्या ५ वर्षांत देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भरीव कामगिरी या भागात झाली, परंतु गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी सरकारने जुन्या योजनांना केवळ स्थगिती देण्याचं काम केले अशी टिका करताना दरेकर म्हणाले की, केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरण आणले. पण दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यात कोरोनामुळे शाळा सुरु करावयाच्या की नाहीत. राज्यात व काही शहरात दोन वेगवेगळे निर्णय घेऊन विद्यार्थी व पालकांच्या भावनांशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचा आरोपगी त्यांनी यावेळी केला.

राज्यातील शिक्षक विमा कवचची मागणी सरकारकडे करत आहेत, पण राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करित आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघातील मतदारांची १२ वर्षे फुकट गेलेली आहेत. एका निष्क्रिय आमदारांनी शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय दिला नाही. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार  प्रा. डॅा. नितीन धांडे यांना निवडून द्या असे आवाहनही दरेकर यांनी यावेळी केले.