क्षमतेचा विकास झाला तरच अर्थव्यवस्थेचे सक्षमीकरण साधेल ः सुरेश प्रभू

February 20,2021

नागपूर, 20 फेब्रुवारी

अर्थव्यवस्था ही प्राचीन काळापासून अस्तित्वात होती. त्यावेळी कोणतेही सरकार अर्थसंकल्प सादर करीत नव्हते. तरीही प्रभावीपणे अर्थव्यवस्था चालत होती. याचाअर्थ अर्थव्यवस्था कोणतेही सरकार चालवित नाही तर देशातील लोक चालवित असतात. त्यामुळेच लोकांच्या क्षमतेचा विकास झाला तरच अर्थव्यवस्थेचे सक्षमीकरण साधतायेणार आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभु यांनी केले.

भारतीय जनता पार्टी नागपूर महानगरच्या वतीने केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 विषयी उद्बोधक विश्‍लेषण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अजय संचेती होते तर खा.डॉ.विकास महात्मे, आ. नागो गाणार, आ. प्रविण दटके, कल्पना पांडे, मिलिंद कानडे, अर्चना डेहनकर, जयप्रकाश गुप्ता, अश्‍विन मेधाडिया यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाबाबतीतील सकारात्मक पैलूंचा यावेळी सुरेश प्रभू यांनी उलगडा केला. अर्थव्यवस्थेचा मुळ कणा हे त्या देशातील लोक असतात. त्यामुळे लोकांच्या अंगभूत कौशल्याचा उपयोग करून घेतल्यास अर्थव्यवस्थेला अधिक चालना मिळू शकते,असे त्यांनी यावेळी सांगितले. देशतील अर्थव्यवस्था सध्या कृषी आणि ऑटोमोबाईल या दोन क्षेत्रावर अधिक अवलबून आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे दोन्ही क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात सुधारणा करणे गरजेचे आहे.त्याची दखल यंदाच्या अर्थसंकल्पात घेण्यात आल्याचे ते म्हणाले. याआधीच्या काळात अनेक चुकीची आर्थिक धोरणे लावल्यामुळे मोठ्या प्रमाणात देशाची अर्थव्यवस्था बिगडली असल्याचेही ते म्हणाले.