नागपुरात आता आयुर्वेद महाविद्यालयातही कोविड रुग्णालय

April 16,2021

नागपूर : १६ एप्रिल - श्री आयुर्वेद महाविद्यालय व पकवासा  समन्वय रुग्णालय येथे १३६ खाटांचे कोविड रुग्णालय उघडण्यासाठी महापौर दयाशंकर तिवारी यांनी पाहणी केली. रुग्णालय पुढच्या सात दिवसांमध्ये कार्यान्वित करण्याचे निर्देश ही त्यांनी दिले.
सध्या नागपूरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये बाधितांना बेड्स उपलब्ध होत नाही. महापौरांनी शहरात रुग्णांसाठी अतिरिक्त बेड्स उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. त्यांनी मानकापूर येथील क्रीडा संकुलमध्ये ५00 बेड्सची व्यवस्था करण्याकरिता मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. आणि जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याशी चर्चा केली. आपल्या नागरिकांसाठी बेड्स उपलब्ध व्हावे म्हणून त्यांनी भारतीय वैद्यक समन्वय समितीचे ट्रस्टी सोबत चर्चा करून त्यांना पकवासा रुग्णालय येथे कोविड रुग्णालय सुरू करण्याचे आवाहन केले. त्यांचा आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत समितीने ओपीडी आणि कॉलेज इमारत वगळून इतर परिसर कोविड रुग्णांच्या उपचारासाठी देण्याची तयारी दर्शविली. महापौरांनी सांगितले की, मनपा डॉक्टरांची व्यवस्था या रुग्णालयासाठी करेल. महापौरांच्या समवेत वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती महेश महाजन, भारतीय वैद्यक समन्वय समितीचे सचिव डॉ. गोविंद उपाध्याय, प्राचार्य डॉ. मोहन येवले, डॉ. जय छांगाणी, डॉ. हर्षा छांगाणी, डॉ. अर्चना दाचेवार, डॉ. मनीषा कोठेकर, उपायुक्त (महसूल) मिलिंद मेर्शाम, सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेन्द्र बहिरवार, डॉ. विजय जोशी, मनपाचे अधीक्षक अभियंता अजय पोहेकर, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हान उपस्थित होते.