रुग्णालयात बेड द्या नाहीतर इंजेक्शन देऊन रुग्णाला मारून टाका - कोरोनाबाधित रुग्णाच्या मुलाची मागणी

April 16,2021

चंद्रपूर : १६ एप्रिल - कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे  महाराष्ट्रातील स्थिती अत्यंत दयनीय बनत चालली आहे. राज्यात अनेक ठिकाणी बेडची मोठ्या प्रमाणात कमतरता  जाणवत आहे. प्रत्येक नातेवाईक आपल्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रचंड ओढाताण करत आहेत. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातही अशीच स्थिती आहे. रुग्णालयात बेडची उपलब्धता नसल्यानं रुग्णांना परत पाठवलं जात आहे. याचा प्रचंड मानसिक त्रास रुग्णांच्या नातेवाईकांना सहन करावा लागत आहे.
अशीच एक घटना राज्यातील चंद्रपूर याठिकाणी घडली आहे. येथील एक मुलगा मंगळवारपासून आपल्या कोरोनाबाधित वडिलांना घेऊन अनेक रुग्णालयांच्या फेऱ्या मारत आहे. पण सर्व ठिकाणी रुग्णालयं गच्च भरलेली असल्यानं त्याच्या हाती निराशा आली आहे. संबंधित मुलाने आपल्या वडिलांवर उपचार करण्यासाठी तीन दिवस केवळ महाराष्ट्रातचं नव्हे तर तेलंगणा राज्यात जाऊनही बेडसाठी याचना केल्या आहेत. पण तिथेही त्याला बेड उपलब्ध झाला नाही. त्यामुळे संबंधित मुलाला आपल्या वडिलांना घेऊन आल्या पावली परत जावं लागलं आहे.
तीन दिवस वडिलांचा जीव वाचवण्यासाठी धावपळ केलेल्या तरुणाने नैराश्यात येऊन, 'आपल्या वडीलांची वैद्यकीय मदत करा अन्यथा इंजेक्शन देऊन त्यांना मारून टाका', अशी मागणी केली आहे. सागर किशोर नाहरशेतिवार असं या तरुणाचं नाव असून तो महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याने मंगळवारी दुपारपासून आपल्या वडिलांचा जीव वाचवण्यासाठी महाराष्ट्र आणि तेलंगणाा सीमेवरील अनेक रुग्णालयांच्या फेऱ्या मारल्या आहेत. पण कुठेही बेड उपलब्ध नाहीये.
नाहरशेतिवार यांच्या मते, महाराष्ट्रात त्यांना बेडची उपलब्धता न झाल्यानं त्यानी रात्री दीडच्या सुमारास तेलंगणा राज्यात गेले होते. रात्री जवळपास तीन वाजता तेलंगणा राज्यात गेल्यानंतर तिथेही बेड उपलब्ध होऊ शकला नाही. रुग्णालयातील बेडची प्रतीक्षा करेपर्यंत त्यांचा ऑक्सिजनही संपत चालला आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्याची हीच अवस्था आहे. अनेक ठिकाणी बेडची कमतरता तर आहेच, शिवाय रेमडेसिवीर इंजेक्शन आणि कोरोना लशीचा तुटवडाही मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.