डॉक्टरने रुग्णालयातून हाकलून लावल्याने रुग्णाची घरीच मृत्यूशी झुंज सुरु

April 16,2021

भंडारा : १६ एप्रिल - भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड सेंटरमधील अतिदक्षता विभागात उपचाराकरिता दाखल करण्यात आलेल्या करोनाग्रस्त रुग्णाला तेथील डॉक्टरांनी हाकलून लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कपूरचंद शेंडे (मु.पिंपळगाव- झंझाड, ता. मोहाडी, जि.भंडारा), असे पीडित रुग्णाचे नाव असून तो सध्या स्वत:च्या घरीच मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला जात असून जिल्ह्य़ात मृत्यूच्या वाढत्या प्रमाणाला आरोग्य विभागाची अशी वागणूक कारणीभूत ठरत असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांकडून केला जात आहे. हा सगळा प्रकार १४ एप्रिलला घडला. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून  दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची  मागणी माजी आमदार चरण वाघमारे यांनी केली आहे.
प्रकृती अस्वस्थाच्या कारणावरून कपूरचंद शेंडे (५१) यांना कुठेही खाटा न मिळाल्यामुळे सायंकाळसुमारास त्यांच्या मुलाने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये नेले. तिथे त्यांना खाट उपलब्ध झाली. त्यामुळे त्यांना तत्काळ उपचाराची गरज होती मात्र त्यांना मध्यरात्रीपर्यंत कोणताही उपचार जिल्हा रुग्णालयात करण्यात आलेल्या नव्हता. दरम्यान, मध्यरात्री अतिदक्षता विभागातील एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने कपूरचंद शेंडे यांना आयसीयूमध्ये खाट उपलब्ध झाली. यावेळी त्यांच्या मुलाने शासकीय नियमानुसार रितसर अर्ज केला मात्र कपूरचंद शेंडे यांच्यावर कोणताही उपचार न करता वॉर्डातील कर्मचाऱ्यांनी अतिदक्षता विभागातून रुग्ण कपूरचंद शेंडे यांच्या मुलाला मारहाण करीत बाहेर हाकलून लावले व रुग्णाला बाहेर काढत त्यांच्या खाटावर दुसऱ्या एका रुग्णाला ठेवण्यात आले. या घटनेमुळे भयभीत झालेल्या रुग्ण कपूरचंद शेंडे यांच्या मुलाने अखेर वडिलाला स्वत:च्या घरी नेले. या प्रकारामुळे जिल्ह्य़ातील आरोग्य प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.