मुलीचे लग्नाचे योग्य वय लवकरच निश्‍चित करणार ः मोदी

October 17,2020

नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर : देशात मुलीचे लग्नाचे योग्य वय काय असायला हवे हे लवकरच निश्‍चित करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. याबाबतचा अहवाल संबंधित समिती देणार आहे. पंतप्रधानांनी ही माहिती फूड अ‍ॅँड अ‍ॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशन अर्थात एफएओच्या पंचाहत्तरीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात दिली.

पंतप्रधान पुढे म्हणाले, देशात मुलींचे लग्नाचे योग्य वय काय असावे याबाबत चर्चा सुरु आहे. संपूर्ण देशातील मुली मला पत्र लिहून संबंधित समिती अजून का कोणताही निर्णय घेत नाही. असे विचारत आहेत. त्यांना मी आश्‍वस्त करु इच्छितो की ज्यावेळी या समितीचा अहवाल येईल त्यावेळी केंद्र सरकार त्वरित त्यावर कार्यवाही करेल. केंद्र सरकारने 22 सप्टेंबरला सांगितले होते की, आई होण्याचे आणि लग्नाचे वय यांचा संबंध तपासण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी संसदेत सुशील कुमरा गुप्ता यांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना ही माहिती दिली होती. दरम्यान आज मोदींनी केंद्र सरकारने महिलांच्या आरोग्य आणि स्वच्छता राखण्याबाबत कोण कोमती पावले उचलली आहेत याची माहिती दिली. ते म्हणाले की, आम्ही आमच्या मुलींची काळजी घेण्यासाठी योग्य ती कार्यवाही करत आहोत. यात जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरात पाणी पोहचवण्याचे काम सुरु आहे. तसेच आम्ही प्रत्येकीला एक रुपयात सॅनिटरी पॅड देत आहे.