महाआघाडी सरकार पडले तर खरा फटका राष्ट्रवादीलाच - प्रवीण दरेकर

November 25,2020

नागपूर : २५ नोव्हेंबर - महाराष्ट्रातील महाआघाडी सरकार पडले तर खरी समस्या राष्ट्रवादी काँग्रेसलाच होणार आहे, त्यामुळे सत्तेच्या गुळाला चिकटलेले मुंगळे धरून ठेवण्यासाठी आमचे सरकार पाच वर्षे टिकेल असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना सांगावेच लागते, अशी टीका भाजप नेते आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. 

विधानपरिषद निवडणुकांच्या प्रचार दौऱ्यादरम्यान आज दरेकर यांनी नागपुरात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. आज सरकारचा सर्वात जास्त फायदा राष्ट्रवादीचं घेते आहे. तो टिकवण्यासाठी तर सरकार टिकवावेच लागेल ना असा टोला त्यांनी लगावला. मात्र या सरकारच्या तीनही पक्षांमध्ये प्रचंड विसंवाद असल्याचे सांगत त्या विसंवादामुळेच हे सरकार पडेल  असा दावा त्यांनी केला. 

केंद्राने मदत केली नाही असे सांगणे म्हणजे आपले अपयश झाकण्यासाठी महाआघाडीने खेळलेली नियोजनबद्ध खेळी असल्याची टीका दरेकर यांनी यावेळी केली . प्रत्येक समस्येच्या वेळी तुम्ही केंद्राकडे बघता मग तुम्ही सत्ता घेतली कशाला? असा सवाल त्यांनी केला. केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला वेळोवेळी मदत केली आहे. असे सांगतांना याबाबतची  आकडेवारीही आपण उपलब्ध करून देऊ शकतो असे त्यांनी ठामपणे सांगितले. 

शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांविरुद्ध ईडीची कारवाई केली असल्यामुळे संतप्त झालेल्या संजय राऊतांनी भाजपच्या १०० नेत्यांची यादी मी चौकशीसाठी ईडीकडे पाठवतो असे आव्हान दिले होते, याबाबत विचारले असता ती यादी उद्याऐवजी आजच पाठवा  असे प्रतिआव्हान त्यांनी दिले. या यादीत तुमचेही नाव असू शकेल असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला असता  मी कोणत्याही चौकशीला तयार आहे असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

ईडीचा वापर कधीही कुणालाही विरोधकांसाठी करता येत नाही, असा खुलासा दरेकरांनी यावेळी केला. आपल्या देशात कायदे आहेत  या कायद्यानुसार ईडी ही स्वायत्त संस्था आहे त्यामुळे कायद्याची चौकट मोडून पक्षीय कारणासाठी ईडीचा वापर करता येत नाही. असा आरोप करणे हा लोकशाहीचा अपमान असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 

सध्याचे महाआघाडी सरकार हे गोंधळाने भरलेले  सरकार असल्याचे सांगत जर मुख्यमंत्री अडचणीत असलेल्या एसटीला मदत करू शकतात  तर उर्जखात्याला का नाही असा सवाल त्यांनी केला. ऊर्जाखाते काँग्रेसकडे असल्यामुळे ही काँग्रेसला सापत्न  वागणूक असल्याचा आरोप करीत सत्तेच्या लाचारीमुळे काँग्रेस नेत्यांमध्ये बोलण्याचे धाडसचं उरले नाही अशी टीका त्यांनी केली.  पत्रपरिषदेला शहर भाजप अध्यक्ष आमदार प्रवीण दटके,प्रदेश प्रवक्ते आमदार गिरीश व्यास, आमदार कृष्ण खोपडे राज्यसभा सदस्य खासदार विकास  महात्मे प्रभृती उपस्थित होते.