निवृत्त नौसैनिक मदन शर्मा पोहोचले राजभवनावर

September 15,2020

मुंबई : १५ सप्टेंबर -अभिनेता सुशांतसिंह तसेच अभिनेत्री कंगना रणौत यांच्याबाबतचा वाद शमत असताना आता निवृत्त सैनिक मदन शर्मा मारहाण प्रकरणाचे राजकारण सुरू झाले आहे. कंगनाच्या राजभवन वारीनंतर आज भाजपाचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आणि भाजपा आमदार अतुल भातखळकर यांच्यासमवेत मदन शर्मा आणि निवृत्त सैनिकांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली.

मदन शर्मा मारहाणप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री दुर्लक्ष करत आहेत. आमदार अतुल भातखळकर आणि मंगल प्रभात लोढा यांनी राज्यपालांना यासंबंधीचे निवेदन दिले आहे. घटनेची शपथ घेतलेले मंत्री देखील या घटनेचे समर्थन करतात, असे मंत्री अनिल परब यांचे नाव घेऊन अतुल भातखळकर यांनी आरोप केला.

राज्यपालांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मदन शर्मा म्हणाले, या घटनेची माहिती मी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना दिली आहे. माझ्या घरात येऊन मला ओढून मारहाण केली. राज्यपालांनी मला कारवाईचे आश्वासन दिले आहे. आम्हाला मारताना मारेकर्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाचे असल्याचा आरोप केला होता. राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. राज्यपालांनी याबाबत केंद्र सरकारशी बोलू असे मला सांगितले.

जळगावमध्ये माजी सैनिकांना झालेली मारहाण आता केवळ राजकारण सुरू आहे. राज्य सरकारने माजी सैनिकांचा अपमान केला आहे. त्यांनी त्यांची माफी मागितली पाहिजे, असे आमदार भातखळकर यांनी यावेळी सांगितले.