कामगार विधेयकाला भामसचा विरोध

September 25,2020

नागपूर : २४ सप्टेंबर - मोदी सरकारने काल  कामगार विधेयकं मंजूर केली. एकीकडे शेती विधेयकांना काँग्रेस आणि इतर पक्षांचा विरोध असताना, मोदींना या कामगार विधेयकांवरुन विरोध झाला आहे थेट संघ परिवारातून. भारतीय मजदूर संघाने या विधेयकाचे पारडे हे प्रशासकीय अधिकारी आणि उद्योजकांच्या बाजूने जड असल्याचा आरोप केला आहे. तसंच यामुळे देशाची औद्योगिक शांतता भंग होईल असं म्हणत घरचा आहेरही दिला आहे. एवढंच नाही तर भारतीय मजदूर संघाने थेट आंदोलनाचा इशाराही दिल्यामुळे, आता प्रश्न असा आहे की खरंच संघ परिवारातील दोन घटक एकमेकांसमोर उभे ठाकणार का?
संसदेत काल तीन कामगार विधेयक मंजूर झाली. 2019 च्या आधी पहिल्या कार्यकाळातही सरकारने ही विधेयके मांडली होती, पण तेव्हा ती स्थायी समितीकडे पाठवण्यात आली. त्यानंतर काही बदलांसह सरकारने ही विधेयके पुन्हा आणली. मात्र आता भारतीय मजदूर संघ जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवाराचा एक अविभाज्य अंग आहे, त्याने विधेयके आणताना स्थायी समितीच्या शिफारसी सरकारने ऐकल्या नसल्याचं सांगितलं.