पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला क्रीडापटूंशी संवाद

September 25,2020

नवी दिल्ली : २५ सप्टेंबर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  फिट इंडिया संवाद कार्यक्रमात आभासी माध्यमाद्वारे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, पॅरालिम्पिकपटू देवेंद्र झांझरिया, अभिनेता व धावपटू मिलिंद सोमण आणि आहारतज्ज्ञ ऋतुजा दिवेकर यांच्याशी संवाद साधला. आपल्या शारीरिक तंदुरुस्तीबाबत जागरुक असणारे व इतरांनासुद्धा जागरुक करण्याचा प्रयत्न करणार्या या दिग्गजांनी आपल्या प्रयत्नांबद्दल व उत्तम प्रकृतीबद्दल आपले विचार पंतप्रधानांसमोर व्यक्त केले. पंतप्रधानांनीसुद्धा आपल्या आरोग्याचे रहस्य सांगितले. आपण तंदुरुस्त राहण्यासाठी मोरिंगा (शेवग्याच्या शेंगांच्या पानांचे) पराठे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा खात असल्याचे त्यांनी सांगून त्यांनी, शारीरिक तंदुरुस्तीबाबत सजग राहण्याचे आवाहन देशवासीयांना केला.

भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूंची यो-यो चाचणी घेतली जाते, मात्र कर्णधाराला यातून सूट मिळते काय, तसेच या चाचणीत काय करावे लागते, असा प्रश्न पंतप्रधान मोदींनी विराटला विचारला तेव्हा विराटला हसू आले व तो म्हणाला की, खेळाडूंची शारीरिक तंदुरुस्ती तपासण्यासाठी ही चाचणी आवश्यक असते. जागतिक स्तरावरील इतर संघांशी तुलना केल्यास आपल्या खेळाडूंची शारीरिक तंदुरुस्ती, क्षमता अजूनही कमी दर्जाची आहे. हाच दर्जा वाढवण्याचा आमचा उद्देश आहे. खेळासाठी ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. वन-डे किंवा टी-20 सामना एका दिवसात संपतो, मात्र कसोटी सामन्यात पाच दिवस खेळावे लागते. रोज सायंकाळी परत जायचे व दुसर्या दिवशी पुन्हा ताजेतवाणे होऊन उत्साहाने मैदानात उतरायचे, हे अत्यंत आवश्यक असते. त्यासाठी शारीरिक तंदुरुस्तीचा दर्जा कायम ठेवणे गरजेचे आहे, असे त्याने सांगितले.

दरम्यान, विराट कोहली सध्या दुबईमध्ये असून येथे गुरुवारी आयपीएलमध्ये विराटच्या संघाचा सामना किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध होणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी अभिनेता, मॉडेल व धावपटू मिलिंद सोमण यांच्याशी संवाद साधताना त्याची शारीरिक तंदुरुस्ती जाणून घेताना मिश्किलपणे त्याच्या वयाबद्दल विचारले. ‘मिलिंदजी, सध्या तुमचे जे वय दिसते ते योग्य आहे का?’ असा प्रश्न पंतप्रधानांनी विचारताच मिलिंद हसू लागला. उत्तर देताना मिलिंद म्हणाला की, मला अनेक लोक विचारतात की तुम्ही खरोखरच 55 वर्षांचे आहात का? पण मी आपल्या पूर्वजांना पाहतो, ते कसे 100-100 किलो मीटर चालत होते. या वयातही मी 500 किमी कसे काय धावू शकतो याचे अनेकांना आश्चर्य वाटते. माझ्या आईचे वय 81 वर्षे आहे. मलाही तिच्यासारखेच व्हायचे आहे. माझी आई माझ्यासाठी व इतर अनेकांसाठी प्रेरणास्थान आहे. मी ‘फिट इंडिया’ उपक्रमाचे कौतुक करतो, असे म्हणत मिलिंद सोमणने आपले काही अनुभव सामायिक केले.

 पंतप्रधान मोदी यांनी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांच्याशी फिट इंडिया उपक्रमाबाबत चर्चा केली. आपण जे सामान्यत: जे जेवतो त्यानंतरही आपण तंदुरुस्त राहू शकतो. कारण त्यात सर्व आवश्यक पोषक घटक असतात, असे दिवेकर या चर्चेदरम्यान म्हणाल्या. पंतप्रधान मोदी यांनीसुद्धा आपल्या शारीरिक तंदुरुस्तीचे रहस्य सांगताना आपण आठवड्यातून एक-दोनदा तरी शेवग्याच्या शेंगांचे पराठे खातो असे सांगितले. कोरोनाच्या या कठीण काळात आपले आईशी आठवड्यातून केवळ दोन-तीन वेळा बोलणे होत असते. जेव्हाही मी आईला फोन करतो तेव्हा ती मला, हळदीचे सेवन करतो की नाही, असे हमखासपणे विचारते, असेही पंतप्रधानांनी सांगितले.