दिल्ली दंगलीच्या आरोपपत्रात मान्यवरांचीही नावे

September 25,2020

नवी दिल्ली : २५ सप्टेंबर - ईशान्य दिल्लीत फेब्रुवारी महिन्यात झालेल्या जातीय हिंसाचारात राजकारण्यांपासून ते विधिज्ञ आणि कार्यकर्त्यांची नावे पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातून येत आहेत. या हिंसाचारात काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद, ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण आणि माकपाच्या पॉलिट ब्युरो सदस्य कविता कृष्णन् यांचे देखील नाव असल्याचे आरोपपत्रातील माहितीवरून समोर आले आहे.

 काँग्रेसची नगरसेविका इशरत जहाँ आणि खालिद सैफी नावाच्या आरोपीने दिलेल्या बयाणात सलमान खुर्शिद आणि प्रशांत भूषण यांचे नाव आले, अशी माहिती सूत्राने दिली. या नेत्यांनी प्रक्षोभक भाषणे दिली होती, असे आरोपींनी बयाणात सांगितले आहे. भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 25 अंतर्गत हे बयाण ग्राह्य धरले जात नाही, हे विशेष.

 दिल्लीत नागरिकत्व कायद्याच्या विरोधात झालेल्या निदर्शनांमध्ये माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सलमान खुर्शिद, विधिज्ञ प्रशांत भूषण, वामपंथी कार्यकर्ता हर्ष मंडेर आणि अलिकडेच राजकारणात प्रवेश केलेले कार्यकर्ते योगेंद्र यादव यांचा समावेश होता, असे बयाण इशरत जहाँने दिले आहे. अशाच प्रकारचे बयाण खालिद सैफी आणि इतर साक्षीदारांनी देखील पोलिसांना दिले आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपींविरोधात 16 सप्टेंबर रोजी तपशीलवार आरोपपत्र दाखल केले. या आरोपींवर बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा, भारतीय दंड विधान, शस्त्रास्त्र कायदा आणि सार्वजनिक संपत्तीच्या नुकसानविरोधी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. आरोपींच्या वकिलांना सोमवारी या आरोपपत्राची प्रत देण्यात आली. विद्यार्थी कार्यकर्ता कंवलप्रीत कौर, वैज्ञानिक गौहर रझा यांची देखील या प्रकरणात नावे समोर आली आहेत.

 नागरिकत्व कायद्याच्या विरोधात दीर्घकाळापर्यंत विरोध कायम ठेवा, असे काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद यांनी सांगितले होते, असे बयाण खालिद सैफीने दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेला दिले आहे. खुर्शिद यांच्यासह कित्येक लोकांना आक्षेपार्ह भाषण देण्यासाठी बोलावले होते, अशी कबुली इशरत जहाँने बयाणात दिली.

 काही जणांनी दिलेल्या आक्षेपार्ह भाषणांमुळेच लोकांनी दीर्घकाळ धरणे दिले. त्या भाषणांमुळे सरकारच्या विरोधात मोहीम राबवण्यासाठी बळ मिळायचे, असे सैफीने पोलिसांना सांगितले होते. खुर्शिद यांनी आक्षेपार्ह भाषण दिल्याचे एका संरक्षित साक्षीदाराने सीआरपीसीच्या कलम 164 अन्वये नोंदवण्यात आलेल्या साक्षीत म्हटले आहे.

 पोलिसांनी अनावश्यक गोष्टींचा समावेश केला असल्याने हे आरोपपत्र 17 हजार पानांचे झाले आहे. 12 जणांनी आक्षेपार्ह भाषणे दिल्याचा दावा केला जात असल्यास, या सर्व व्यक्तींनी एकाच प्रकारचे भाषण केले असे होऊ शकत नाही तसेच चिथावणी देण्याची प्रत्येकाची पातळी एकसारखीच होती, असेही होऊ शकत नाही. देशात चिथावणी देणे आणि गर्दी जमा करणे हा गुन्हा नाही, असे सलमान खुर्शिद यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.