आता नासा महिलांनाही चंद्रावर पाठवणार

September 25,2020

वॉशिंग्टन : २५ सप्टेंबर - अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने आपल्या नवीन चांद्र मोहिमेची घोषणा केली आहे. या मोहिमे अंतर्गत नासा आता महिला अंतराळवीर चंद्रावर उतरवणार आहे. नासाचे प्रमुख जिम ब्रिडेनस्टीन यांनी मंगळवारी आर्टेमिस मिशन बाबतची घोषणा केली. याआधी 1972 मध्ये नासाने चांद्र मोहीम पूर्ण केली होती. त्यानंतर आता जवळपास 52 वर्षानंतर ही मोहीम आखली आहे.

 जिम ब्रिडेनस्टीन यांनी सांगितले की, अमेरिकन संसदेने आम्हाला डिसेंबर महिन्यापर्यंत 23 हजार 545 कोटी डॉलर्सची मंजुरी दिल्यास चांद्र मोहीम प्रत्यक्षात आणणे शक्य होणार आहे. ही चांद्र मोहीम चार वर्षात पूर्ण करणार असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अंतराळ यान उतरणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या चांद्र मोहिमेसाठी 28 अब्ज डॉलर्स म्हणजेच जवळपास दोन लाख कोटींचा खर्च येणार आहे.

 नासाने या चांद्र मोहिमेसाठी 48 प्रशिक्षित अंतराळवीरांची एक चमू तयार केली आहे. या मोहिमेद्वारे चंद्रावरील परिस्थितीचा प्रत्यक्ष शास्त्रीय आणि भौगोलिक स्थितीचा अभ्यास नासाचे शास्त्रज्ञ करणार आहेत. आर्टेमिस मोहिमेतील आम्ही प्रथमच महिला अंतराळवीराला चंद्रावर उतरवून इतिहास घडवणार असल्याचे ब्रिडेनस्टाईन यांनी म्हटले. ही चांद्र मोहीम विविध टप्प्यात पार पडणार आहे. पहिला टप्पा मानवविरहीत असणार असून नोव्हेंबर 2021 मध्ये याची सुरुवात होणार आहे. दुसर्या व तिसर्या टप्प्यात अंतराळवीर चंद्राभोवती असणार आहेत. तर, 2024 मध्ये महिला अंतराळवीर चंद्रावर उतरणार आहे. अपोलो-11 प्रमाणे ही मोहीम एक आठवडा असणार आहे. या मोहिमेत अनेक गोष्टींचा शोध घेण्याचा प्रयत्न होणार असल्याचे नासाने म्हटले आहे.

 तीन लूनर लँडर तयार करण्यासाठीची योजना आखणे सुरू आहे. लँडर तयार करण्यासाठी ब्लू ओरिजिन अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांची कंपनी दावेदार मानली जात आहे. दुसरे लँडर अॅलन मस्क यांची कंपनी स्पेसएक्स बनवत आहे. तर तिसर्या कंपनीचे नाव डायनॅटिक्स असे आहे. या तीनही कंपन्या लूनर लँडर तयार करणार आहेत.