भिवंडीतील इमारत कोसळण्याप्रकरणात उच्च न्यायालयाने घेतली स्वतःहून दखल

September 25,2020

मुंबई : २५ सप्टेंबर - ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील इमारत कोसळण्याचा प्रकार अतिशय गंभीर आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेत  स्पष्ट केले.

महाराष्ट्र सरकार, बृहन्मुंबई महानगरपालिका, भिवंडी-निझामपूर पालिका, कल्याण-डोंबिवली, ठाणे आणि नवी मुंबई नगर प्रशासनाने याप्रकरणी उत्तर सादर करावे, असा निर्देश यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी दिला आहे.

कल्याण-डोंबिवली येथील बांधकामाच्या संदर्भात सुनावणी करीत असताना, मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी भिवंडी येथील अपघाताचा उल्लेख करीत, भिवंडी येथे इमारत कोसळून ४० जण ठार झाले, हा प्रकार अतिशय गंभीर असल्याचे म्हटले.

मुंबईच्या बाह्यभागात असलेल्या भिवंडीतील इमारत सोमवारी कोसळून यात काही जणांना प्राण गमवावा लागला. मुंबईतही अशीच भयावह स्थिती असल्याचे आम्ही सांगितले आहे. या प्रकरणी आम्ही राज्य सरकार आणि संबंधित महापालिकांना प्रतिवादी करीत असून, त्यांना नोटीस पाठवत आहोत.

पाठवलेल्या नोटीसवरून राज्य सरकार आणि संबंधित महापालिका उत्तर सादर करतील, हे सुनिश्चित करावे, असे उच्च न्यायालयाने महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना सांगितले.