भारत-चीन प्रश्नी चर्चेतूनच तोडगा - एस. जयशंकर

September 25,2020

नवी दिल्ली : २५ सप्टेंबर - भारत-चीनच्या सीमेवरील परिस्थिती अभूतपूर्व असून, येथे दोन्ही देशांत मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला आहे. यावर चर्चेच्या माध्यमातूनच तोडगा काढावा लागेल, असे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी  स्पष्ट केले.

चीनने अलिकडेच कित्येक वेळा भारतीय हद्दीत घुसखोरी केली आहे. चीनच्या या आगळीकीमुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अभूतपूर्व तणाव निर्माण झाला, असे त्यांनी सांगितले. रशियात झालेल्या शांघाय सहकार्य परिषदेच्या पृष्ठभूमीवर एस. जयशंकर यांची चिनी परराष्ट्रव्यवहार मंत्री वांग यी यांच्यासोबत काही दिवसांपूर्वी जवळपास अडीच तास बैठक झाली होती. या बैठकीत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्याबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत सीमेवरील तणाव संपवण्यासाठी पाच कलमी करार झाला.

दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरूच राहतील आणि दोन्ही देशांचे लष्कर मागे हटवण्याची प्रक्रिया वेगवान करण्यात येईल, यावर सहमती झाली होती.

पूर्व लडाखमध्ये सीमेवर चीनशी तणावाची स्थिती कायम आहे. यादरम्यान, भारताकडून सर्व प्रकारची तयारी केली जात आहे. एकीकडे सीमेवर सैनिकांच्या तैनातीत वाढ करण्यात आली आहे, तर दुसरीकडे सीमेवर कमीत कमी वेळेत पोहोचण्यासाठी पायाभूत सुविधांवरही भर देण्यात येत आहे. दुसरीकडे चीननेही सीमेवर आपले लष्कर वाढवले आहे.

त्याचबरोबर भारत आणि चीनच्या सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांकडून प्रयत्न सुरू आहेत. भारतीय वायुदलानेही चीनच्या कुठल्याही आगळीकीला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सतर्कता वाढवली तसेच सीमा क्षेत्रात कार्यक्षमता देखील वाढवली आहे. त्याच वेळी, सध्याच्या अडचणींसह, हिवाळ्यासाठी सर्व तयारीची पडताळणी केली जात आहे.

सीमापार दहशतवाद मोठे आव्हान

सीमापार दहशतवाद, ‘कनेक्टिव्हिटी’ रोखणे तसेच व्यापारात अडथळे निर्माण करणे, ही प्रमुख आव्हाने असून, दक्षिण आशिया प्रादेशिक सहकार्य संघटनेतील (सार्क) सदस्य देशांनी या क्षेत्रात शाश्वत शांतता आणि सुरक्षा निर्माण करण्यासाठी या आव्हानांवर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. सार्कच्या आठ सदस्य देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची आज गुरुवारी अनौपचारिक बैठक आभासी स्वरूपात झाली. या बैठकीत ते बोलत होते. भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या मतभेदांमुळे सध्या सार्कचे कामकाज थंडावले आहे.