सुद्धा भारद्वाज यांचा जमीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला

September 25,2020

नवी दिल्ली : २५ सप्टेंबर - कोरेगाव भीमा प्रकरणातील आरोपी सुधा भारद्वाज यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला. गुरुवारी शिखर न्यायालयाने मेडिकल आधारावर दाखल करण्यात आलेला सुधा भारद्वाज यांच्या अंतरिम जामीन अर्जावर सुनावणी करण्यास नकार दिला. सोबतच, गुणवत्तेच्या आधारावर जामीन अर्ज दाखल करण्याचा सल्लाही न्यायालयाने सुधा भारद्वाज यांना दिला.

या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायमूर्ती यू यू ललित यांनी तुम्ही मेडिकलच्या आधारावर का संपर्क केला? रक्तशर्करेचे प्रमाण योग्य आहे. मेडिकल चाचणीच्या आधारावर दाखल केलेल्या या जामीन अर्जावर आम्ही तुमची साथ देऊ शकत नाही. तुम्ही गुणवत्तेच्या आधारावर जामिनासाठी का अर्ज करत नाही? असा प्रश्नही न्यायालयाने विचारला. यावर सुधा भारद्वाज यांच्या वकील वृंदा ग्रोवर यांनी याचिका परत घेतली. सुधा भारद्वाज यांच्याजवळ कोणतेही आक्षेपार्ह सामान आढळले नसल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

२८ ऑगस्ट रोजी एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी प्रोफेसर सुधा भारद्वाज यांचा अंतरिम जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला होता. सुधा भारद्वाज सध्या मुंबईतील भायखळा तुरुंगात बंद आहे. प्रकृती अस्वास्थ्याचे कारण पुढे करत त्यांच्याकडून जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने राज्य सरकारकडून दाखल करण्यात आलेल्या शपथपत्राचाही विचार केला. यात २१ ऑगस्टच्या प्रकृती चाचणीचा अहवालही समाविष्ट होता. या अहवालात सुधा भारद्वाज यांची प्रकृती सामान्य असल्याचा उल्लेख आहे.

गरज भासल्यास सुधा भारद्वाज यांना सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात येईल. याअगोदर याच प्रकरणातील दुसरे आरोप वरवरा राव यांच्या प्रकरणातही त्यांना ही सुविधा मिळाली होती, असेही न्यायालयाने म्हटले. यापूर्वी एल्गार परिषद - कोरेगाव भीमा प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सामाजिक कार्यकर्ता सुधा भारद्वाज यांच्या जामीन याचिकेला एनआयएने विरोध केला होता. सुधा भारद्वाज यांची प्रकृती उत्तम असल्याचे एनआयएने मुंबई उच्च न्यायालयात म्हटले होते. गरज भासल्यास भायखळा तुरुंगातील अधिकारी भारद्वाज यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी सक्षम आहेत, असेही एनआयएने म्हटले होते.