एटीएम मधून रोख रकम उडवणारी टोळी पोलिसांनी केली गजाआड

September 25,2020

नागपूर : २५ सप्टेंबर - एटीएममध्ये तांत्रिक बिघाड करून रोख रक्कम उडविणार्या टोळीचा नंदनवन पोलिसांनी छडा लावला आहे. ही टोळी हरियाणातील असून, टेक्नोसावी पद्धतीने एटीएममधील रोकड लंपास करीत होते. याप्रकरणी आसिफ खान जुम्मा खान (वय २१) आणि शहादत खान मोहम्मद या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीनंतर आरोपींनी त्यांनी केलेल्या पाच गुन्हय़ांची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून २२ एटीएम कार्ड, मोबाईल आणि रोख रकमेसह पाच लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. 

ही टोळी विशिष्ट प्रकारे एटीएममध्ये तांत्रिक बिघाड करून चोरी करतात. एटीएममध्ये चोरी करताना आरोपी पहाटेच एटीएममध्ये शिरतो. त्याच्याकडील एटीएम कार्डचा वापर करून व्यवहार करतो. त्यानंतर मशिन ब्लॉक केली जाते. त्यानंतर एटीएमच्या वरचे झाकण उघडून आरोपी केलेला व्यवहार अर्धवट राहील, अशी व्यवस्था करतो. अर्थात, त्यामुळे कॅश शटरमध्ये रोकड अडकून पडते. त्यानंतर आरोपी ही रक्कम काढून पुन्हा दुसरा असाच व्यवहार करतात. अशाप्रकारे एका एटीएममध्ये वारंवार रक्कम काढली जाते. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यानंतर सीताबर्डीतून आरोपींना अटक करण्यात आली.