बुलढाण्यात कोरोना तपासणी लॅब कार्यान्वित

September 25,2020

बुलडाणा : २५ सप्टेंबर - गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील आरटीपीसीआर लॅबला आयसीएमआरची परीक्षांनंतरची मान्यता मिळाल्याने आरटीपीसीआर लॅब कार्यान्वित झाली आहे. जिल्ह्यातील कोरोना संदिग्ध रुग्णांच्या नमुन्याचा पहिला लॉट याठिकाणी तपासण्यात येत आहे.

जिल्ह्यातील कोरोना संदिग्ध रुग्णांचे नमुने पूर्वी तपासणीसाठी अकोला, अमरावती, यवतमाळ तर कधी नागपूर येथे पाठवावे लागत होते. तेथून त्यांचे तपासणी अहवाल यायला चार चार दिवस लागत होते. त्यामुळे जिल्ह्यातच लॅब असावी म्हणून जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी यासाठी लागणारा निधी तात्काळ उपलब्ध करून देत, जिल्हा प्रशासनाला या संदर्भातील प्रस्ताव तयार करून आयसीएमआरकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आयसीएमआरकडून मान्यता मिळाल्यानंतर लॅबच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली होती. संपूर्ण मशनरी स्थापन झाल्यावर आयसीएमआरकडून आलेले दोन कोरोना संदिग्ध रुग्णाचे नमुने तपासण्यात आले व त्याचा अहवाल आसीएमआरला पाठविण्यात आला होता. त्यांनतर २२ सप्टेंबर रोजी आयसीएमआर ने परीक्षणानंतरची मान्यता दिली असून आज पासून हि लॅब अधिकृतरित्या सुरु झाली आहे. या लॅबमध्ये सुरुवातील दररोज ६0 नमुने तपासण्यात येतील. त्यानंतर या लॅबची क्षमता वाढविण्यात येणार असून यामध्ये दररोज ५00 ते ६00 नमुने तपासण्यात येणार आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना संदिग्धचे नमुने जिल्ह्यातच तपासणी होणार असल्याने कोरोनाच्या प्रादुभार्वावर देखील यामुळे नियंत्रण मिळविण्यात येईल.