दारुड्या मुलाची आईनेच केली हत्या

September 25,2020

यवतमाळ : २५ सप्टेंबर - दिग्रस तालुक्यातील खंडापुर येथील एका दारूड्या मुलाची आईने लाकडी काठीने डोक्यात वार करून हत्या केल्याची घटना गुरुवार दि.२४ सप्टेंबर सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. विनोद श्रीराम राठोड (वय-४0) रा.खंडापुर ता. दिग्रस असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. मृतक हा दररोज दारूच्या नशेत आई रमला श्रीराम राठोड (वय-६५) रा.खंडापूर हिला नाहक त्रास देत होता. तसेच आईला शारीरिक सुखाची मागणी करीत असल्याने आईने त्याच्या त्रासाला कंटाळून त्याच्या डोक्यावर लाकडी काठीने वार करून ठार केले. मृतकाने आपल्या लहान भावाचा खून केला होता. त्या गुन्ह्यातून त्याची सुटका झाली होती. त्याची पत्नी त्याच्या सोबत घरी नांदायला नव्हती. तो दारूच्या नशेत आईला त्रास देत होता व शारीरिक सुखाची मागणी करीत होता. या त्रासाला कंटाळूनच तिने हत्या केल्याचे उघड झाले. हत्या झाल्याची माहिती पोलिसांना मिळताच उपविभागीय पोलिस अधीक्षक उदयसिंह चंदेल, पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत कडू, निळकंठ चव्हाण, प्रभाकर जाधव, ब्रम्हानंद टाले, अविनाश राठोड, गाडे सह पोलिस ताफा घटनास्थळी दाखल झाले आहे