अचलपुरात शेतकऱ्यांचे बँकेतच ठिय्या आंदोलन

September 25,2020

अमरावती : २५ सप्टेंबर - जिल्हा बँकेच्या अचलपूर शाखेत पीक कर्जासाठी अर्ज केल्यानंतरही कर्ज न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्यांनी गुरुवारी जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयात धडक दिली व ठिय्या आंदोलन सुरू केले. दरम्यानच बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्याला एक फोन आला व त्या व्यक्तीने शेतकर्यांना तुरूंगात टाका, अशी सुचना केल्याने उपस्थित सर्व शेतकरी चांगलेच संतापले होते. त्या व्यक्तीचे नाव सांगा, अशी भुमिका शेतकर्यांनी घेतल्यावर बँकेत तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

शेतीसाठी कर्ज मिळावे म्हणून अचलपूर तालुक्यातील 60 शेतकर्यांनी जिल्हा बँकेच्या अचलपूर शाखेत गेल्या काही दिवसांपूर्वीच अर्ज केला होता. मात्र, त्यांचे कर्ज प्रकरण मंजूर झाले नाही. त्यांच्या नंतर अर्ज करणार्यांना कर्ज मिळाले. या संदर्भात शेतकर्यांनी विचारणा केल्यावर समर्पक उत्तर मिळाले नाही. त्यानंतर सर्व शेतकरी शाखा व्यवस्थापक खंडारे यांना भेटले. त्यांनी मुख्य शाखेने कर्ज प्रकरणाला मंजुरी न दिल्यामुळे कर्ज देण्यात आले नसल्याचे शेतकर्यांना सांगितले. त्याचाच जाब विचारण्यासाठी सर्व शेतकरी गुरुवारी जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेत आले. त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी राठोड यांना जाब विचारत त्यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन सुरू केले. राठोड यांनी समर्पक उत्तर दिले नाही.

 दरम्यानच राठोड यांना भ्रमणध्वनीवर एक फोन आला. समोरून बोलणार्या व्यक्तीने आंदोलनकर्त्या शेतकर्यांची पोलिसांना माहिती देऊन तुरूंगात टाका, अशी सुचना केली. त्यामुळे शेतकरी चांगलेच संतप्त झाले. शेतकर्यांना तुरूंगात टाका, असे म्हणणारा व्यक्ती कोण आहे. त्याचे नाव आम्हाला सांगा अशी आग्रही मागणी शेतकर्यांनी सुरू केली. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले. जोपर्यंत आम्हाला कर्ज मिळणार नाही, तो पर्यंत आम्ही येथून जाणार नाही, अशी भुमिका शेतकर्यांनी घेतली. अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी राठोड यांनी शुक्रवारी संचालक मंडळाची बैठक आहे, त्या बैठकीत कर्जाचे प्रकरण ठेवण्यात येईल, असे लेखी आश्वासन शेतकर्यांना दिले.