मुसळधार पावसाचा सोयाबीन आणि कापसाला फटका

September 25,2020

वर्धा : २५ सप्टेंबर - वर्धा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पाऊस व वादळी वार्यामुळे सोयाबीनसह कापसावर संक्रांत आली आहे. शेंगा भरलेल्या असलेल्या सोयाबीनला कोंब तसेच कापसालाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षीच्या तुुलनेत यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात 33 हजार हेक्टरने वाढ झाली असून जिल्ह्यात 1 लाख 40 हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली तसेच कापसाचे क्षेत्रही बर्यापैकी आहे.

शेतकर्यांना खरीप हंगामाच्या प्रारंभापासूनच विविध संकटाचा सामना करावा लागत आहे. सुरुवातीला सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याने बहुतांश शेतकर्यांना दुबार-तिबार पेरणीला सामोरे जावे लागले. त्यानंतर अळी, किडींचा सामना करत सोयाबीनचे पीक मोठे केले. शेंगा लागल्या मात्र गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने सोयाबीनच्या शेंगामधील दाण्यांना कोंब फुटल्याने पीक शेतातच सडू लागले आहे. आणखी काही दिवस पाऊस असाच सुरू राहिला तर शेतकर्यांच्या पदरात किती सोयाबीन पडणार, याची चिंता आहे.

 सातत्याने सुरू असलेला पाऊस थांबण्याची चिन्हे दिसत नसल्याने याचा कापसाला फटका बसू लागला आहे. अनेक भागात कापसाच्या झाडाला बोंडधारणा झाली असून पावसामुळे बोंडे काळवंडत असल्याचे दिसून येते. त्यामुळे कापसाचे उत्पादन शेतकर्यांच्या हातात पडणार की नाही याची शाश्वती दिसत नाही. पावसामुळे सोयाबीन पिकावर चक्री भुंगा, खोडमाशीने आक्रमण केले. मोठ्या प्रमाणात रस शोषण झाल्याने हे पिक देणे भरण्यापूर्वीच पिवळे पडले. काही शेतकर्यांच्या शेतातील सोयाबीनला फुले लागली नाहीत. त्याचा परिणाम सोयाबीन पिकाची वाढ झाली. पण, यामुळे शेंगा लागल्या नाहीत. त्यामुळे अनेक शेतकर्यांनी सोयाबीनच्या पिकात गुरे सोडली. तर काहींनी रोटावेटर फिरविले. पावसामुळे वाळलेल्या झाडाच्या शेंगांवर बुरशी चढून ओलाव्याने शेगांमधील दाण्यांना अंकुर फुटू लागले आहे. शिवाय कापसाच्या पिकाचेही मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. जिल्ह्यात पावसाने नुकसान झालेल्या सोयाबीन व कापूस या पिकांचे जिल्हा प्रशासकीय यंत्रणेमार्फत सर्व्हेक्षण करून शेतकर्यांना तत्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.