वाशिममध्ये पुराच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करा - पालकमंत्री

September 25,2020

वाशीम : २५ सप्टेंबर - वाशीम जिल्ह्यात काही दिवसांत अतिवृष्टी, पुरामुळे पिकांचे तसेच घरांचे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या आढावा बैठकीत दिल्या. तसेच सततच्या पावसामुळे झालेल्या सोयाबीन पिकाच्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कळमकर, पशुसंवर्धन उपआयुक्त बोरकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

 पालकमंत्री देसाई म्हणाले, जिल्ह्यातील ज्या मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे, तेथील नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत. गेल्या काही दिवसात सतत पाऊस पडत आहे, तसेच आगामी काही दिवसांत पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील सोयाबीन पिकाचे नुकसान होत असून झाडावरच शेंगांना अंकुर फुटत असल्याचे दिसून येत आहे. या नुकसानीची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच कृषिमंत्री दादाजी भुसे यांना देवून जिल्ह्यातील शेतकर्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले.

 पावसामुळे व पुरामुळे काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. या नुकसानीचे पंचनामे प्राधान्याने करून देय असलेली नुकसान भरपाई संबंधितांना त्वरित उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी. जेणेकरून नागरिकांना आपल्या घराची दुरुस्ती करण्यासाठी मदत उपलब्ध होईल. तसेच पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना सुद्धा नियमानुसार तातडीने मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्री देसाई यांनी केल्या. जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गाचा तसेच वाशीम येथे उभारण्यात येत असलेल्या आरटी-पीसीआर प्रयोगशाळा उभारणीच्या कामाचा आढावाही पालकमंत्री देसाई यांनी यावेळी घेतला. प्रयोगशाळेचे काम अंतिम टप्प्यात असून, आगामी दहा दिवसांत ही प्रयोगशाळा कार्यान्वित होईल, यासाठी सूक्ष्म नियोजन करून त्याप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.