नऊ वर्षाच्या लढ्याला अखेर यश आले

September 25,2020

नागपूर : २५ सप्टेंबर - एक मूत्रपिंड दान केल्यामुळे विमा कंपन्यांकडून सतत नाकारल्या जाणाऱ्या नागपूरमधील डॉक्टरच्या नऊ वर्षांच्या लढय़ाला अखेर यश आले. विमा कंपन्यांकडून मिळणाऱ्या वागणुकीचे दाखले थेट पंतप्रधान कार्यालयात गेल्यावर या प्रश्नाची दखल घेतली गेली. त्यानंतर विमा कंपनीने या डॉक्टरच्या एका मूत्रपिंडाच्या तपासणीचा अहवाल मागवून त्यांना विमा काढण्याची हमी दिली. त्यांच्या या लढय़ामुळे एक मूत्रपिंड असलेल्या व्यक्तींनाही यापुढे विमा मिळण्यास सुकर होणार आहे.

नागपूरच्या विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीचे माजी सचिव डॉ. रवि वानखेडे यांनी २००९ साली त्यांच्या सलीम चिमथानवाला या बालमित्राला मूत्रपिंड दान केले. मोहन फाऊंडेशनचे नागपूरचे प्रमुख असलेले ७२ वर्षीय डॉ. वानखेडे यांनी स्वतला अवयव दानाच्या चळवळीत वाहून घेतले आहे. त्यांच्या कार्याची दखल माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी घेतली आहे. मित्राला मूत्रपिंड दान केल्यानंतर दोन वर्षांनी विमा नियमित करण्यासाठी त्यांनी कंपनीकडे अर्ज केला. तेव्हा त्यांचा अर्ज एक मूत्रपिंड असल्यामुळे फेटाळला गेला. इतर कंपन्यांबाबतही त्यांना हाच अनुभव आला. त्यांनी विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाशी (आयआरडीए) संपर्क साधला.  वैद्यकीय चाचणी केल्यावर विमा काढण्यास हरकत नसावी, असे प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. पण नऊ वर्षांत कुठल्याही विमा कंपनीने विमा काढण्यास तयारी दाखविली नाही. अखेर त्यांनी पंतप्रधान कार्यालयात गाऱ्हाणे मांडले. त्यानंतर विमा कंपनीला जाब विचारण्यात आला. आता वानखेडे यांच्या विम्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

केवळ एक मूत्रपिंड म्हणून विमा कंपन्यांनी डॉ. रवि वानखेडे यांचा विमा काढण्यास गेल्या नऊ वर्षांपासून टाळाटाळ केली. डॉ. वानखेडे यांनी पंतप्रधान कार्यालयाला याबाबतचे पत्र पाठविले.

त्यात विम्याशी संबंधित जगभरातील शोधनिबंधाचा अभ्यास करून अवयवदान करणाऱ्यांना आरोग्य विमा नाकारण्याचा प्रकार कुठेही घडला नसल्याचे स्पष्ट केले.

पंतप्रधान कार्यालयाकडून या प्रश्नाची दखल घेतल्यावर आता विमा कंपनीने त्यांचा विमा काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

सरकार अवयवदान वाढवण्यासाठी  विविध प्रोत्साहनात्मक उपक्रम राबवते, तर दुसरीकडे विमा कंपन्या अवयवदात्यांना विमा काढू देत नाही. पंतप्रधान कार्यालयाने हस्पक्षेप केल्यावर विमा कंपनीने प्रतिसाद दिला. इतरही अवयवदात्यांना हाच न्याय आवश्यक आहे. – डॉ. रवि वानखेडे,