नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त

September 25,2020

गडचिरोली : २५ सप्टेंबर - २१ सप्टेंबरपासून २७ सप्टेंबरपर्यंत नक्षल सप्ताह आहे. या पार्श्वभूमीवर जयशंकर भुपालपल्ली जिल्ह्यातील कलेश्वरम पोलीस स्टेशन हद्दीतील तेलंगाणा- महराष्ट्र सीमेवर तेलंगाणा पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे. छत्तीसगढ, महाराष्ट्रतून ये-जा करणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.

एकीकडे नक्षलवाद्यांनी पुकारलेला नक्षलसप्ताह, दुसरीकडे गडचिरोली जिल्ह्या लगत आसिफाबाद कोमूरभीम जिल्ह्यात जहाल नक्षल अग्रनेता मैलारपू आढेल ऊर्फ भास्कर याच्या नेतृत्वात आसिफाबाद जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा शिरकाव झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सतर्कता बाळगून कॉम्बिंग आपरेशन तीव्र केले आहे.

दरम्यान, १९ सप्टेंबरला कदंबा जंगलात नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत २ नक्षल्यांना कंठस्नान घालण्यास तेलंगणा पोलिसांना यश आले होते. मात्र, जहाल माओवादी भास्करसह इतर सहकारी पसार झाले होते. त्यांचा शोध सुरू आहे. ते गडचिरोली जिल्हा किंवा छत्तीसगड राज्यात शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे, तेलंगाणा सीमेवरील कालेश्वरम, तसेच छत्तीसगडमधील कोत्तागुडाम येथील तेलंगाणा सीमेवर पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे.