काश्मिरी नागरिक स्वतःला भारतीय मानत नाही - फारुख अब्दुल्ला

September 25,2020

श्रीनगर : २५ सप्टेंबर - वर्षभरापूर्वी केंद्र सरकारनं जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारच्या या निर्णयाचं काही जणांनी स्वागत केलं होतं. तर काही जणांनी याचा विरोधही केला होता. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनीदेखील कलम ३७० पुन्हा लागू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता त्यांनी आणखी एक वादग्रस्त दावा केला आहे. काश्मिरी नागरिक स्वत: भारतीय मानत नसल्याचा दावा त्यांनी केला. काश्मिरी नागरिक स्वत:ला भारतीय मानत नाही ना ते भारतीय होऊ इच्छितात. याबदल्यात त्यांच्यावर चीननं शासन करावं असं त्यांना वाटत असल्याचं फारूख अब्दुल्ला म्हणाले. त्यांनी ‘द वायर’ला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे.

“मी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर आश्चर्य वाटेल जर त्यांना (सरकारला) त्या ठिकाणी स्वत:ला भारतीय म्हणणारी कोणी व्यक्ती सापडेल. तुम्ही त्या ठिकाणी जा, कोणाशीही बोला ते ना स्वत:ला भारतीय मानतात ना पाकिस्तानी हे मी स्पष्ट करू इच्छितो,” असंही ते म्हणाले. “आता काश्मिरी जनतेला सरकारवर भरवसा राहिलेला नाही. दोन्ही देशांच्या विभाजनाच्या वेळी खोऱ्यातील लोकांना धर्माच्या आधारावर तयार झालेल्या पाकिस्तानमध्ये जाणं सोपं होतं. परंतु त्यावेळी त्यांनी महात्मा गांधींच्या भारताचा स्वीकार केला ना की मोदींच्या भारताचा,” असंही त्यांनी नमूद केलं.