यंदाचा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा रद्द

September 25,2020

नागपूर : २५ सप्टेंबर - नागपुरात दरवर्षी विजयादशमीच्या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा वर्धापन दिन सोहळा अत्यंत उत्साहात साजरा होत असतो. मात्र यंदा हा सोहळा आणि यानिमित्ताने आयोजित केले जाणारे सर्व कार्यक्रम कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आले असल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले यांनी एका पत्रकाद्वारे दिली. 

धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा नागपूरच्या दीक्षाभूमीवर दरवर्षी साजरा होतो. या सोहळ्याला देशभरातून लाखो बौद्ध भाविक ऊपस्थित राहतात. याच सोबत १४ ऑक्टोबर रोजीही असाच भाविकांची गर्दी खेचणारा कार्यक्रम होत असतो. यंदा अशा गर्दीत एखादा लक्षणहीन कोरोनाबाधित येण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे घडल्यास अनेकांना कोरोनाची लागण होऊ शकते ही भीती लक्षात घेऊन स्मारक समितीने विजयादशमीच्या दिवशी म्हणजेच २५ ऑक्टोबर रोजी होणारा मुख्य सोहळा आणि १४ ऑक्टोबर रोजी होणारा  सोहळा हे दोन्ही कार्यक्रम रद्द केले आहेत. या निमित्ताने लाखो भाविकांनी आपापल्या घरीच बुद्धवंदना करून डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करावे असे आवाहन डॉ. सुधीर फुलझेले यांनी केले आहे.