शहीद जवान नरेश बडोले यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 25,2020

नागपूर : २५ सप्टेंबर -   शहीद जवान नरेश उमराव बडोले यांच्या पार्थिवावर  आज नागपुरातील  डिगडोह स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. जम्मू काश्मीर मधील बडगाम जिल्ह्यातील चाडूरा भागातील बडीपूरा येथे 24 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यात येथील जवान बडोले शहीद झाले आहेत.    

 शहीद जवान  बडोले यांच्या पार्थिवाला त्यांच्या मुली मृणाल (22) तसेच प्रज्ञा (20) यांनी भडाग्नी दिला. तत्पूर्वी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वतीने  बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देत शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवाला सलामी देण्यात आली. यावेळी  त्यांच्या पत्नी श्रीमती प्रमिला नरेश बडोले (44) आप्त परिवार व सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


खासदार कृपाल तुमाने, आमदार समीर मेघे, पोलीस महानिरीक्षक संजय लाटकर, उपमहानिरीक्षक संजय कुमार, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे कमांडंट सुभाष चंद्र, करुणा राय, मुख्य चिकित्सा अधिकारी डॉ. अलेक्स पी. टी.,  पोलीस उपायुक्त विक्रम साळी, विवेक मसाळ, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत कुमार खराबे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर शिल्पा खरपकर, ग्रामीण उप विभागीय अधिकारी  इंदिरा चौधरी, हिंगण्याचे  सभापती बबनराव आवडे, तहसिलदार संतोष खंडरे, कल्याण संघटक सत्येंद्र चौरे, सरपंच इंद्रायणी कारबाने आदींनी यावेळी पुष्पचक्र अर्पण करुन  श्रद्धांजली वाहिली. 


गृहमंत्र्यांनी अर्पण केले पुष्पचक्र

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बडोले यांच्या निवासस्थानी जावून कुटुंबाची सांत्वना केली. शहीदाच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनीही आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. जिल्हा प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी यांनी श्रद्धांजली अर्पण केली.