पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा डोहात बुडून मृत्यू

September 25,2020

अमरावती : २५ सप्टेंबर - अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यातील खोडगाव येथील शहानुर नदीच्या डोहात पोहण्याच्या केलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेमुळे  परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोरोनाच्या काळामुळे लॉकडाउन लागू झाला. त्यामुळे शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. सर्वत्र ऑनलाइन पद्धतीने शाळा सध्या सुरू आहे. त्यामुळे दर्शन सतीश गायगोले (वय 15) आणि दिवेश दीपक गायगोले (वय 16) हे दोघे अंजनगाव सुर्जी तालुक्यातील धनेगाव येथील आजी सोबत खोडगाव येथील मामाकडे आले होते.

हे दोघेही खोडगाव येथील त्यांचे मामा रघुनाथ गावंडे यांचे घरी आले होते. आज दिनांक 25 एप्रिल रोजी दुपारी एक वाजता शहानुर नदीमध्ये मित्रांसोबत पोहण्यासाठी गेले होते.  पण नदीतील डोहात पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघांचा बुडून मृत्यू झाला.

गावलगतच असलेल्या नदीपात्रात पोहत असतांना डोहात बुडाले असता त्यांच्या सोबत असलेल्या लहान मुलांनी गावंडे यांच्या घरी येऊन माहिती दिली. त्यानंतर उपस्थित नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. दोन्ही भावांच्या मृत्यूमुळे परिसरात खळबळ उडाली. या घटनेमुळे घटनास्थळावर नातेवाईकांचा एकच आक्रोश पाहण्यास मिळाला.

गावकऱ्यांनी दोन्ही मुलांना पाण्यातून मृतावस्थेत बाहेर काढले. या घटनेची माहिती अंजनगाव पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.