गोंदियात बिनमास्क फिरणाऱ्यांना आता ५०० रुपये दंड - पालकमंत्र्यांची घोषणा

September 25,2020

गोंदिया : २५ सप्टेंबर - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र, जिल्ह्यातील नागरिकांकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता करण्यात आलेल्या उपाय योजनांचे पालन केले जात नसल्याचे चित्र समोर आले आहे. तसेच विनामास्क फिरणाऱ्यांचेही प्रमाण जास्त आहे. या पार्श्वभूमीवर विनामास्क फिरणाऱ्यांवर २०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येत होती. त्या दंडाच्या रकमेत आता ५०० रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही घोषणा केली. 

गृहमंत्री देशमुख हे गुरुवारी आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांच्या सोबत गोंदिया येथे कोरोनाचा आढावा घेण्याकरिता आले होते. यावेळी अनिल देशमुख यांनी मास्क न वापरणाऱ्या लोकांकडून येत्या शनिवार पासून ५०० रुपये दंड आकारण्यात येईल, अशी घोषणा केली. यावेळी गोंदिया जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने उपययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या.