धनगर आरक्षणासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या घरासमोर आंदोलन करणार - गपिचंद पडळकर

September 25,2020

पंढरपूर : २५ सप्टेंबर - मराठा आरक्षणानंतर आता धनगर आरक्षणाची मागणी जोर धरु लागली आहे. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी पंढरपुरात भाजपा आमदार आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्त्वाखाली ‘ढोल बजाओ’ आंदोलन करण्यात आलं. हुतात्मा चौकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. गोपीचंद पडळकर यांनी यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

आंदोलनावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं की, “राज्य सरकारचा गैरसमज दूर केला आहे. धनगढ नावाची जमात अस्तित्वात नाही. जे आहे ते धनगर आहेत. त्यांना दाखला देण्यास सुरुवात करावी. सरकारने अध्यादेश काढून आरक्षण द्यावं आणि केंद्राला यासंबंधी माहिती द्यावी”.

सरकारला इशारा देताना त्यांनी सांगितलं की. “आता तुम्ही जागे व्हा. आज धनगर समाज शांततेने आंदोलन करत आहे. जर त्यांच्या भावनांचा विचार केला गेला नाही, काही निर्णय झाला नाही तर मंत्र्यांच्या बंगल्यांसमोर आंदोलन करु. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर आंदोलन करणार. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओकबाहेर मी स्वत: जाऊन ढोल वाजवणार”.

सत्ताधारी आमदारांच्या घराबाहेर जाऊन धनगराचा मुलगा ढोल वाजवेल आणि झोपेचं सोंग घेतलेल्या नेत्यांना जागं करु असंही ते म्हणाले आहेत. “हे आंदोलन कोणाच्याही नेतृत्त्वात चालू नाही. मी धनगर समाजाचा कार्यकर्ता असून जबाबदारी म्हणून आंदोलन घोषित केलं आहे. कोणत्याही पत्रकावर माझं नाव, फोटो नाही. माझा हेतू स्वच्छ आणि प्रामाणिक आहे. धनगर समाजाच्या हितासाठी सर्व काही करु,” असं यावेळी ते म्हणाले आहेत. .