अमरावती विद्यापीठात दुसऱ्या दिवशीही कर्मचाऱ्यांचे कामबंद

September 25,2020

अमरावती : २५ सप्टेंबर - विद्यापीठ कर्मचारी महासंघाने सातव्या वेतन आयोगासह विविध महत्वपूर्ण मागण्यांसाठी पुकारलेल्या कामबंद आंदोलनाला दुसऱ्या दिवशीही संपूर्ण कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद देऊन आपले कार्यालयीन कामकाज पूर्णपणे बंद ठेवले आहे. विशेष म्हणजे सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यालयात उपस्थिती दर्शवून कार्यालयाबाहेर दिवसभर ठिय्या दिला.

महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त संघर्ष समितीने संपूर्ण राज्यभरात २४ सप्टेंबरपासून लेखणी तसेच अवजारबंद आंदोलन सुरू केले आहे. अमरावती विद्यापीठ कर्मचारी संघाच्या या आंदोलनात येथील ऑफिसर्स फोरम तसेच मागासवर्गीय कर्मचारी संघटना देखील सक्रियतेने सहभागी आहे. त्यामुळे विद्यापीठातील कुठल्याही विभागात सध्या कोणताही कर्मचारी कार्यरत नाही. त्यामुळे कार्यालये ओस पडली असून टेबल रिकामे आहेत. फाईलींचा प्रवास देखील थांबला आहे. याचा फटका विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, संस्था, विद्यार्थी तसेच सामान्य नागरिकांना बसत असल्याचे दिसून येते. यासंदर्भात विद्यापीठातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी संघटनेची भुमिका आमच्यासाठी अंतिम असून आता न्याय मिळाल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नसल्याचे सांगितले.