घ्या समजून राजे हो...हाथरसची दुर्घटना- सखोल विचारमंथन व्हायला हवे

October 06,2020

उत्तरप्रदेशातील हाथरस येथे घडलेले प्रकरण आणि त्यातून केले जात असलेले राजकारण हे दोन्ही प्रकार दुर्दैवीच म्हणावे लागतील. या प्रकारात एका निरपराध बालिकेचा हकनाक जीव गेला आहे. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक या सर्वांकडूनच केले जात असलेले राजकारण हे जनसामान्यांना चीड आणणारे ठरले आहे. या प्रकारात खरा दोषी कोण हे शोधण्याचा प्रयत्न केल्यास सत्ताधारी आणि विरोधक हे सारखेच जबाबदार आहेत असे लक्षात येते. त्यामुळे या प्रश्‍नावर राजकारण बाजूला ठेवून विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

घडले असे की, उत्तरप्रदेशातील हाथरस या जिल्ह्यात एक तरुणी शेतात काम करीत असताना तिला काही गावगुंड घेऊन गेले आणि तिच्यावर अतिप्रसंग किंवा बलात्कार केला. येथे सामूहिक बलात्कार झाल्याचाही आरोप केला गेला. ही घटना 14 सप्टेंबरची. त्या संध्याकाळी ही तरुणी जखमी अवस्थेत शेताच्या बाजूला सापडली. यावेळी त्या नराधमांनी तिची जीभही कापून टाकली होती. अशाच अवस्थेत तिला हाथरसच्या शासकीय रुग्णालयात भरती केले गेले तिथे आठवडाभर उपचार केल्यानंतर अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने तिला दिल्लीतील सफदरजंग हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले. तिथेच उपचारादरम्यान मृत्यू झाला.

गेल्या आठवड्यात तिचा मृत्यू झाल्यानंतर तिचे शव अ‍ॅम्ब्युलन्सने पोलिस बंदोबस्तात तिच्या गावी आणण्यात आले. त्यानंतर तिच्या परिवारातील सदस्यांना तिचा मृतदेह सोपवणे अपेक्षित होते. मात्र परिवारातील सदस्यांच्या आरोपानुसार पोलिसांनी हा मृतदेह घरी नेऊ न देता किंवा परिवारातील सदस्यांना तिचे अन्त्यदर्शनही घेऊ न देता परस्पर स्मशानात नेला आणि मध्यरात्री अडीच वाजता तिचा मृतदेह जाळून टाकला असा आरोप केला गेला.

या घटनेचे पडसाद सर्वदूर पसरले. सहाजिकच उत्तरप्रदेश सरकारने विशेष चौकशी पथकाचे (एसआयटी) गठन केले आणि या प्रकाराची चौकशी सुरु झाली. या घटनेमुळे जनमनत प्रक्षुब्ध झाले होते. सहाजिकच देशातील विरोधी पक्षांनी याचा फायदा घेण्याचा व्यवस्थित प्रयत्न केला. काँग्रेसचे नेते राहूल गांधी आणि त्यांच्या भगिनी उत्तरप्रदेशच्या काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी हे दोघेही या पीडितेच्या परिवाराला भेटायला निघाले. त्यांनी या भेटीच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्याचेच ठरवले होते. त्यामुळे काहीशे कार्यकर्ते सोबत घेऊन ते निघाले. एव्हेना उत्तरप्रदेश सरकारने त्या परिसरात 144 कलम लागू केले होते. राहूल आणि प्रियंकाचा ताफा उत्तरप्रदेशच्या सीमेवर अडवल्यानंतर इथे जी काही व्हायची ती नौटंकी पार पडली. राहूल आणि प्रियंका या दोघांनाही तेथे अटकही करण्यात आली. दोन दिवसांनी पुन्हा हाच प्रकार झाला. तेव्हा राहूल आणि प्रियंका पाच जणांसोबत जाऊन पीडितेच्या परिवाराला भेटून आले. याच दरम्यान पोलिसांनी त्या गावात प्रसिद्धी माध्यमांनाही जाण्यावर बंदी घातली होती. या मुद्दावरही देशभर प्रचंड गदारोळ सुरु होता. प्रसिद्धी माध्यमांनी तेथे 27 तासाचा सत्याग्रह केल्याचाही बातम्या झळकल्या. नंतर त्यांना पीडितेच्या परिवाराशी भेट घेऊ देण्यात आली. या दरम्यान जनमताचा रेटा वाढल्यामुळे की काय पण उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्याची घोषणा केली. हे प्रकरण हाताळणार्‍या काही पोलिस अधिकार्‍यांना निलंबित केल्याचीही घोषणाही त्यांनी केली.

अबलेवर बलात्कार करणे, तिला मारहाण करून प्रसंगी तिचा जीव घेणे नंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार आपल्या देशात या पूर्वीही घडलेले आहेत. आज उत्तरप्रदेशात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. केंद्रातही भाजपच आहे. त्यामुळे उत्तरप्रदेशातील या घटनेवरून भाजपविरोधक वेगाने सक्रिय झाले. त्यांनी ही संधी घेत भाजपवरच टीका करणे सुरु केले. त्याच्या उत्तरात भाजपने काँग्रेसशासित किंवा इतर भाजपविरोधकांच्या राज्यांमध्ये देखील असे बलात्कार होत असल्याची आकडेवारीच जाहीर केली. इथे मुद्दा असा येतो की, महाराष्ट्रात वर्षभरात अशा 50 बलात्काराच्या घटना घडल्याचे दाखले तुम्ही देत असाल तरीही उत्तरप्रदेशातील ही एक घटना समर्थनीय ठरत नाही. बलात्कार हा महाराष्ट्रात होवो कि गुजराथ किंवा उत्तरप्रदेशमध्ये, तो निंदनीयच आहे त्यातच बलात्कारानंतर त्या महिलेला मारहाण करणे, प्रसंगी तिचा जीव घेणे हा तर क्रौर्याचाच प्रकार म्हणावा लागेल. अशा गुन्ह्यांना कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी त्यासाठी आपल्या देशात वेळोवेळी कायदेही केले गेले आहेत. मात्र देशातील न्यायव्यवस्था बघता अशा आरोपींना शिक्षा होईलच असे नसते. अनेकदा पुराव्याअभावी आरोपी सुटतातही. समजा आरोप पुराव्यानिशी सिद्ध झालेही तरी शिक्षा व्हायला वर्षोनुवर्षाचा काळ लोटतो. अशा सर्व प्रकारांमुळे गुन्हेगारांना वचक राहिलेला नाही. त्यामुळे हे गुन्हे होतात. या बाबी लक्षात घेता महाराष्ट्रात वर्षभरात 50 घटना घडल्या, उत्तरप्रदेशात कमी आहेत अशी मुजोरी निरर्थक ठरते.

प्रस्तुत प्रकरणात गुन्हा घडल्यावर सदर तरुणीला तत्काळ दिल्लीला हलवणे गरजेचे होते. मात्र इथे पोलिसांचे दुर्लक्ष झाले असेच म्हणावे लागते. आठवडाभराने तिला दिल्लीला हालवले मात्र तिथे प्रयत्नांना यश मिळाले नाही. असे प्रकार अनेकदा घडतात. मात्र अशावेळी प्रसंगी प्रक्षुभ्ध असलेले जनतम शांत करून मृतदेह नातलगांकडे सोपवला जातो. अशावेळी माध्यमांना कोणतेही अडथळे आणले जात नाहीत. मात्र या प्रकारात पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांकडे न सोपवता परस्पर स्मशानात नेऊन जाळणे, ज्या गावात ही घटना घडली त्या गावात माध्यमांना जाऊ न देणे, राजकीय नेत्यांनाही पीडितेच्या परिवाराला भेटू न देणे हे सर्वच निर्णय अनाकलनीय वाटतात. सुरुवातीचे काही निर्णय पोलिसांनी आपल्या जबाबदारीवर घेतले असतीलही, मात्र ज्यावेळी राष्ट्रीय स्तरावरील विरोधी पक्षाचे नेते हस्तक्षेप करीत आहेत हे लक्षात आल्यावर पोलिसांनी पुढचे निर्णय स्वतः घेतले नसणार आणि वरिष्ठ अधिकारी किंवा गृहमंत्री स्तरावरच हे निर्णय झःाले असणार हे निश्‍चित. या पार्श्‍वभूमीवर उत्तरप्रदेशचे पोलिस जसे हे प्रकरण हाताळण्यात चुकले तसेच उत्तरप्रदेशचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही निर्णय चुकीचेच ठरले आणि त्यामुळेच प्रकरण जास्त चिघळले हे स्पष्ट दिसते. जर मृतदेह नातेवाईकांकडे सोपवून अन्त्यसंस्कार करू दिले असते आणि नंतर वृत्तसंकलनासाठी जाणारे माध्यम प्रतिनिधी किंवा पीडितेच्या परिवाराला भेटण्यास जाणार्‍या राजकीय नेत्यांना अडथळे आणले नसते तर या प्रकाराला दिलेली अवास्तव प्रसिद्धी आणि महत्त्व टाळता आले असते. राहूल गांधी भेटायला निघाले असता पहिल्याच दिवशी पाच जणांना एका वाहनाने हाथरसला रवाना केले असते तर हे प्रकरण दुसर्‍या दिवशीपासून माध्यमांवर अभावानेच दिसले असते. यातच पोलिसांनी सदर महिलेवर बलात्कार झालाच नाही असा केलेला दावा हा देखील गोंधळ वाढवणारा ठरला. अन्त्यसंस्कारापूर्वी हाथरसचे जिल्हाधिकारी सदर पीडितेच्या नातेवाईकांना धमकावत आहेत असा व्हिडिओही व्हायरल झाला होता. हा प्रकारही प्रशासनाने टाळला असता तर प्रकरणाला वेगळे वळण लागले नसते.

सत्ताधार्‍यांप्रमाणे विरोकानही या प्रकरणात चुका केल्या आहेत. घटना घडल्यानंतर पीडितेच्या परिवाराला भेटायला जाताना केलेले शक्तिप्रदर्शन हे अनावश्यकच होते. जर राहूल आणि प्रियंका आपल्या मोजक्या सहकार्‍यांसह पीडितेच्या परिवाराला भेटायला गेले असते तर इतका गोंधळा झालाही नसता.  तसाच प्रकार काल समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय लोकदलाच्या नेत्यांनीही केला. त्याठिकाणी शेकडो कार्यकर्त्यांसोबत गेल्यावर पोलिसांनी अडवले महणून पोलिसांवर केलेली दगडफेक आणि नंतर पोलिसांनी केलेला लाठीहल्ला हे सर्वच प्रकार टाळता आले असते. त्याचबरोबर देशभर भाजपविरोधकांनी केलेली निदर्शेने, नेत्यांनी केलेली आक्रस्तळी वक्तव्ये हे सर्व प्रकारही टाळता आले असते.

आपल्याकडे आधी नमूद केल्याप्रमाणे बलात्काराच्या घटना वारंवार घडतात. प्रत्येक घटनेनंतर कमी जास्त प्रमाणात आरडाओरडही होते. त्यावर चर्चा, खल, मंथन असे सर्व प्रकार होतात. मात्र अशा प्रकारांच्या मुळाशी जाऊन हे प्रकार थांबवता कसे येतील यावर विचार होणे गरजेचे आहे. सध्या या घटनेच्या विविध पडसादांमध्ये काही नेत्यांनी उधळलेली मुक्ताफळेही कानावर येतात. अनेकजण महिलांना यात दोषी धरतात. महिलांचे बेभान वागणे, स्वातंत्र्याच्या नावाखाली आधुनिक पोषाख करणे वेळीअवेळी फिरणे यालाही हे कथित विद्वान जबाबदार धरतात. मात्र पुरुषप्रधान संस्कृतीतले हे कथित विचारवंत पुरुषांना आणि त्यांच्यातील कामवासनेला दोष द्यायला तयार नसतात. माणूस वयात आल्यावर त्याची कामवासना जागृत होेणे हे समजू शकतो. मात्र येथे माणूस सुसंस्कारित असला तर असे प्रकार टाळलेही जाऊ शकतात. एका विचारवंताने तरुणांमधील बेकारी याला जबाबदार असल्याचे म्हटले आहे. बेकारीमुळे तरुणांना मुली मिळत नाही आणि त्यांचे विवाह होत नाहीत. परिणामी असे तरुण असे कामांध बनतात असा या विचारवंताचा दावा होता. यात तथ्य कितपत आहे हे आज सांगणे कठीण आहे. मात्र एकूणच देशातील बेकारी संपवून प्रत्येक हाताला काम कसे मिळेल याचा विचार करायला हरकत नसावी.

हे सर्व मुद्दे लक्षात घेता आज या प्रकारात कोण चुकले आणि कोण बरोबर यावर वाद करण्यापेक्षा भविष्यात असे् प्रकार घडूच नये यासाठी काय करता येईल यावर विचारमथन होणे गरजेचे आहे. आपल्याकडे असे प्रकार झाले की, देशातील विरोधक हे सत्ताधार्‍यांना जबाबदार ठरवतात आणि त्याचे चक्क राजकारण करण्यातच धन्यता मानतात. असे न होता जर देशातील सर्व पक्षातील ज्येष्ठ नेते आणि समाजातील विचारवंत यांनी एकत्र बसून भविष्यात हे प्रकार कसे टाळता येतील यावर विचारमंथन करायला हवे. या मंथनातून जे नवनीत निघेल, जे उपाय समोर येतील त्यावर तत्काळ अंमलबजावणी केली जायला हवी.

भारताला जागतिक महाशक्ती बनवायचे असेल तर प्राथमिक गरज आहे ती सुसंस्कृत समाजाच्या जडणघडणीची. आज देशात रामराज्य आणण्याच्या गोष्टी केल्या जात आहेत. प्रत्येक स्त्रीचा सन्मान ही रामराज्याची एक संकल्पना होती. त्याच धरतीवर आज आपल्या देशात प्रत्येक स्त्रीचा सन्मानच होईल आणि भविष्यात असे कोणत्याही महिलेला अत्याचाराला सामोरे जावे लागणार नाही आणि पीडिता म्हणून मृत्यूला कवटाळावे लागणार नाही अशी स्थिती येईल तो या देशातील सुदिन ठरेल. रामराज्याच्या वाटेवरील ते पहिले पाऊल असेल.

ही परिस्थिती यावी यासाठी आपण सर्वच आजपासूनच विचारमंथन सुरु करु या.

 तुम्हाला पटतंय का हे? त्यासाठी आधी तुम्ही समजून तर घ्या राजे हो....

ता.क.ः घ्या समजून राजे हो या लेख मालिकेतील अविनाश पाठक यांचे लेख वाचण्यासाठी त्यांच्या ुुु.षरलशलेेज्ञ.लेा/इश्रेससशीर्ईंळपरीहझरींहरज्ञ या फेसबुक पेजवर जाऊन वाचता येतील.

 

-अविनाश पाठक