असामान्य व्यक्तिमत्वाचे धनी डॉ. उदय बोधनकर

October 09,2020

नागपुरातील ख्यातनाम बालरोगतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. उदय बोधनकर यांना भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राच्या भाजप वैद्यकीय आघाडीच्या सल्लागार समितीवर सदस्य म्हणून नेमल्याची घोषणा गेल्या आठवड्यात करण्यात आली.

डॉ. बोधनकर हे फक्त नागपूरातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेले बालरोगतज्ज्ञ आहेत. त्याशिवाय त्यांची सामाजिक बांधिलकीही लक्षणीय आहे. फक्त डॉक्टर म्हणून नव्हे तर एक चांगला मित्र म्हणून ते सर्वच क्षेत्रात ख्यातनाम आहेत. राजकारणाबाबत बोलायचे झाले तर सर्वच राजकीय पक्षांमध्ये त्यांचे मित्र आहेत. जितक्या सहजतेने ते विलास मुत्तेमवारांशी बोलतात तितक्याच सहजतेने नितीन गडकरींशीही मैत्री करतात. देवेंद्र फडणवीस, विकास ठाकरे, अनिल देशमुख आणि नितीन राऊत या सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांची चांगलीच मैत्री आहे. आयुष्यातला काही काळ त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणूनही घालावला असून आजही संघवर्तुळात त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.

विशेष म्हणजे डॉ. उदय बोधनकर हे देशाच्या राष्ट्रीय राजकारणातील एक दिग्गज व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या गेलेले माजी केेंद्रीय मंत्री स्व. वसंत उपाख्य बापूसाहेब साठे यांचे जावई आहेत. बापूसाहेब साठे यांची धाकटी कन्या सुनिती हिच्याशी 1981 मध्ये डॉ. उदय बोधनकर विवाहबद्ध झाले. त्यावेळी हा प्रेमविवाह नव्हता. डॉ. बोधनकरांचे वैद्यकीय क्षेत्रातील कर्तृत्व पाहून साठे परिवाराला हा तरुण आवडला आणि रितसर प्रस्ताव नेऊन डॉ. बोधनकर विवाहबद्ध झाले. त्यावेळीही आपली राजकीय मते, विचारधारा हे काहीही बोधनकरांनी लपवले नव्हते. तरीही सर्वांचे संबंध राजकारण बाजूला ठेवून जपले गेले. डॉ. बोधनकरांची सामाजिक प्रतिमा बघता बापूसाहेब साठे यांचे राजकीय वारसदार म्हणून पुढे  येण्याची त्यांना बरीच संधी होती. मात्र बोधनकरांनी तो मोह कटाक्षाने टाळला.

बापूसाहेब साठे यांचे निधन 2011 मध्ये झाले. त्यानंतर त्यांच्या परिवारातून कोणीही राजकारणात आलेले नाही. काही दिवसांपूर्वी त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी एका वृत्तपत्राने या संदर्भात बातमीही दिली होती. त्यावेळी साठे परिवारातील सर्वांशीच प्रस्तुत स्तंभलेखकाचे बोलणे झाले. तेव्हा आमच्यापैकी कोणीही राजकारणात येण्यास इच्छूक नाही असे सर्वांनीच स्पष्ट केले होते.

डॉ. उदय बोधनकर हे मी आधी नमूद केल्याप्रमाणे ख्यातनाम बालरोगतज्ज्ञ आहेत. विविध अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी रुग्णसेवेत नाव कमावले आहे. त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीचा आढावा घ्यायचा झाल्यास स्वतंत्र लेख लिहावा लागेल. शिक्षण पूर्ण झाल्यावर काही काळ त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी नोकरी सोडून नागपुरात खाजगी प्रॅक्टीस सुरु केली. आज मध्यभारतातील आघाडीचे बालरोगतज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती आहे.

 वयाच्या 35व्या वर्षी भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्षपद भूषवले आणि  त्यांनी  जेसीआय इंटरनॅशनल  या संघटनेचा आऊटस्टँडिंग यंग डॉक्टर ऑफ दी वर्ल्ड हा पुरस्कार मिळविला होता हे नमूद करणे गरजेचे आहे. यापूर्वी हा पुरस्कार फक्त स्व. डॉ.श्रीकांत जिचकार यांनाच मिळाला होता.

आजही डॉ. बोधनकर कॉनवेल्थ असोसिएशन फॉर हेल्थ अ‍ॅण्ड डेसॅबिलिटी या जागतिक संघटनेचे पदाधिकारी आहेत. काही काळ डॉ. बोधनकर या संघटनेचे अध्यक्षही राहिले आहेत. विविध आंतरराष्ट्रीय संघटनांवर त्यांनी काम केले आहे तर जगातील विविध विद्यापीठांमध्ये व्याख्याते म्हणूनही ते जाऊन आले आहे. त्यांच्या या कर्तृत्वाची दखल घेत राष्ट्रीय स्तरावर तर अनेक मान्यवरांनी त्यांच्याशी संवाद साधला.  इंग्लंडची राणी क्विन एलिझाबेथ यांनीही  व्यक्तिशः डॉ. बोधनकर यांची भेट घेऊन त्यांचा विशेष सन्मानही केला होता.


डॉ. बोधनकर हे जसे वैद्यकीय शास्त्रातील तज्ज्ञ आहेत तसेच ते रसिक वाचक आणि लेखकही आहेत. तिमिरातून उदयाकडे हे डॉ. बोधनकरांचे आत्मचरित्र मराठीत तर प्रचंड गाजलेच पण त्याचे हिेंदी भाषांतरही केले गेले. लवकरच या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतरही प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. या पुस्तकाचे विशेष कौतुक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, बिग-बी अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक मान्यवरांनी केले आहे. 

भाजपच्या वैद्यकीय आघाडीच्या सल्लागार समितीवर नेमले गेलेले डॉ. बोधनकर हे एकमेव गैरराजकीय व्यक्ती आहेत हे विशेष. बाकी सर्व सल्लागार सदस्य हे भाजपचे सदस्य आणि लोकप्रतिनिधी आहेत.

वैद्यकीय आघाडीचे सल्लागार म्हणून तुम्ही काय करू इच्छिता असे डॉ. बोधनकरांना विचारले असता राज्यात आरोग्य सेवा ही प्रत्येक व्यक्तीच्या आटोक्यात असावी, त्याच्या खिशाला परवडणारी असावी आणि त्याला स्विकारार्हही असावी या दृृष्टीने आपण भाजपला सल्ला देण्याचे काम करू असे डॉ. बोधनकरांनी सांगितले. वैद्यकीय सेवेत फक्त डॉक्टर्स नसतात, नर्सेस, टेक्निशियन्स, वॉडबॉईज, अटेंन्डंस, फार्मासिट असे विविध लोक कार्यरत असतात. यांच्याही समस्या आहेत. सत्तेतील पक्ष म्हणून भाजपने त्यादृष्टीनेही प्रयत्न करावे असे मी सुचविले. सरकारने वैद्यकीय सेवेसोबत औषधांच्या किंमतीही जनसामान्यांना परवडणार्‍या ठेवाव्या असा माझा आग्रह असेल असेही डॉ. बोधनकर यांनी स्पष्ट केले.


लहानपणापासून मी चारचौघात वाढलो. सर्वांना घेऊन चला अशी माझ्या आई-वडिलांनी शिकवण दिली. वसुधैवं कुटुम्बकम या तत्वाने आम्ही जगायला शिकलो. आजवरच्या वैद्यकीय सेवेत मी हेच तत्व अंगिकारले. सर्वधर्मसमभाव जपला आणि मानवतेची सेवा केली. मिळालेल्या या नव्या संधीच्या रुपात देखील मला याच मार्गावर पुढे जायचे आहे असे डॉ. बोधनकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

मी कोणत्याही एका पक्षाचा किंवा विचारधारेचा नाही. माणूसकी हाच माझा धर्म आणि पक्ष आहे. तिच माझी विचारधारा आहे. काही लोक माझे सासरे काँग्रेसचे म्हणून मला एका पक्षाचे लेबल लावू बघतात तर आता मी भाजपशी जवळीक कशी केली म्हणून भुवय्या उंचावतात. मात्र मला मानवतेची सेवा करायची आहे. त्यासाठी कोणतेही बॅनर किंवा कोणतेही संघटना मला त्याज्य नाही असेही डॉ. बोधनकर यावेळी म्हणाले.

डॉ. बोधनकरांच्या या वाटचालीत त्यांचे आई-वडील, सासू-सासरे, गुरुजन आणि मित्रपरिवार यांचे योगदान तर आहेच. विशेष म्हणजे त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुनिती, मुलगा निखिल मुलगी प्रियंका सून केतकी या सर्वांचाच त्यांना साथ राहिला आहे.

असामान्य व्यक्तिमत्वाचे धनी म्हणून ओळखले गेलेले डॉ. उदय बोधनकर या नव्या संधीचे सोने करतील याबाबत कोणाच्याही मनात शंका नाही.

                             -अविनाश पाठक