ग्राहकांना केंद्रबिंदू मानून सहकारी बँकांनी वाटचाल करावी - नितीन गडकरी

October 19,2020

नागपूर : १९ ऑक्टोबर - सहकारी संस्था, बँका या व्यावसायिक आहेत. व्यापारी नव्हेत. ग्राहकांना केंद्र बिंदू मानून त्यांनी आपली वाटचाल करावी आणि गरीब माणसाला मदत होईल या दृष्टीने कार्य करावे, असे आवाहन केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएमएसई मंत्री नितीन गडकरी यांनी केले. जनता सहकारी बँकेच्या पदाधिकार्यांशी ते 'आत्मनिर्भर भारत' या विषयावर व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधत होते. 

या दरम्यान बोलताना गडकरी म्हणाले, लहान लोकांना मोठे करणे हेच सहकारी बँकेच्या यशाचे गमक आहे. १0 लाख रुपयांपर्यंत कर्ज लहान व्यावसायिकांना उपलब्ध होणार्या आर्थिक संस्था निर्माण व्हाव्यात अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. सहकारी बँका गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यात यशस्वी झाल्या आहेत. पण अन्य राज्यात मात्र यशस्वी झाल्याचे दिसत नाही. रिझर्व्ह बँकेचे धोरण सहकारी बँकांना प्रोत्साहन देणारे ठरले नाही. आता सरकारने रिझर्व्ह बँकेला अधिकार दिले आहेत. यशस्वी लोकांकडे पाहून हे धोरण बनवले गेले पाहिजे. शोषित, पीडितांना दिलासा मिळाला पाहिजे. ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित असाव्यात याकडेही लक्ष दिले गेले पाहिजे.

आत्मनिर्भर देश होण्यासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या भागाचा विकास होणे आवश्यक आहे. एमएसएमईच्या माध्यमातून आपण ६ कोटी रोजगार निर्मिती केली आहे. ४८ टक्के निर्यात केली आहे. देशातील अन्य क्षेत्रांनीही आयात कमी, निर्यात अधिक, जैविक इंधनाचा वापर केला पाहिजे. आपण सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करून विकास आणि स्वावलंबी झाल्याशिवाय देश आत्मनिर्भरतेकडे जाणार नाही, असेही गडकरी म्हणाले.

आता डिपॉझिट मिळविणे कठीण नाही. राष्ट्रीयकृत बँकांकडे चार लाख कोटींचे डिपॉझिट अधिक पडले आहे. सहकारी बँकांकडे डिपॉझिट मोठय़ा प्रमाणात आहे. पण हा पैसा गुंतवला गेला पाहिजे. नियम जटिल असल्यामुळे त्यात अडचणी निर्माण होत आहेत, असे सांगून गडकरी म्हणाले, पेन्शन, शेअर आणि विमा अर्थव्यवस्था या क्षेत्रात गुंतवणूक अधिक झाली तर त्यातून परतावा चांगला मिळू शकतो. या तीन अर्थव्यवस्था खूप मोठे क्षेत्र आहे. गरिबी, उपासमार आणि बेरोजगारी हे देशाच्या अर्थव्यवस्थेसमोरील मोठे आव्हान आहे. कृषी, ग्रामीण, आदिवासी आणि ११५ मागास जिल्ह्यांचा विकास होणार नाही, तोपर्यंत देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढणार नाही. तोपर्यंत देश आत्मनिर्भर होणार नाही, असेही ते म्हणाले.