मी भाजपचा राजीनामा दिला नाही - एकनाथ खडसे

October 19,2020

जळगाव : १९ ऑक्टोबर - मी भारतीय जनता पक्ष सोडलेला नाही तसेच राजीनामाही दिलेला नाही असे भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिल्याच्या चर्चा आणि वृत्त काही प्रसारमाध्यमांनी प्रसारित केले होते. मात्र एकनाथ खडसे यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मी भाजप हा पक्ष सोडलेला नाही असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे हे नाराज आहेत. त्यांनी त्यांची नाराजी जाहीरपणे बोलूनही दाखवली होती. जळगावात गेल्या काही दिवसांपासून घटस्थापनेच्या दिवशी एकनाथ खडसे भाजपा सोडणार अशाही चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान एकनाथ खडसे यांनी मी पक्ष सोडलेला नाही, राजीनामा दिलेला नाही असे म्हटले आहे.

नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १७ ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वतुर्ळात रंगल्या आहेत. मात्र त्यानंतर विजयादशमी किंवा त्याआधी एकनाथ खडसे भाजपाला राम राम करुन राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्याही चर्चा रंगल्या. आज काही वेळापूर्वी काही प्रसारमाध्यमांनी एकनाथ खडसे यांनी भाजपा सोडल्याच्या बातम्या चालवल्या. यानंतर एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण देत मी भाजपा सोडलेले नाही आणि राजीनामा दिलेला नाही असे स्पष्टीकरण दिले आहे.