यावर्षी दिवाळीकरिता चिनी वस्तूंची आयात होणार नाही - कॅटचा निर्णय

October 19,2020

नवी दिल्ली : १९ ऑक्टोबर - भारत आणि चीनच्या सीमेवर अजूनही तणाव कायम आहे. भारताचा विश्वासघात करत चीनने गेल्या अनेक महिन्यांपासून सीमेवर कुरापती सुरूच ठेवल्या आहेत. गेल्या ४५ वर्षांमध्ये झाल्या नाहीत, अशा घटना घडत आहेत. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत भारताचे २0 जवान शहीद झाले होते. तर चिनी सैनिकांनाही आपले प्राण गमवावा लागले. त्यामुळे भारतात चीन विरोधात मोठे वातावरण तापले आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स म्हणजेच कॅटने एक योजना तयार केली असून त्याला देशभरातल्या व्यापार्यांचाही प्रतिसाद मिळत आहे.

दिवाळी हा देशातल्या सर्वात मोठा सण असल्याने त्यादरम्यान लोक सर्वात जास्त खरेदी करत सतात. या काळात गेल्या काही वर्षांमध्ये ७0 हजार कोटींचा व्यवसाय होतो. त्यात जवळपास ४0 हजार कोटींच्या वस्तूंची आयात ही चीनमधून होत असते. यावर्षी ही चीनमधून वस्तूच आयात करायच्या नाहीत असा निर्णय या व्यापार्यांनी घेतला आहे. त्यामुळे चीनला ४0 हजार कोटींचा मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. शोभेच्या वस्तू, पूजेचे सामान, ईलेक्ट्रीक गॅझेट्स, विजेच्या माळांपासून ते फटाक्यांपयर्ंत सगळ्याच वस्तू स्वस्त असल्याने चीनमधून आयात केल्या जात होत्या. मात्र आता बदलत्या परिस्थितीत ही आयात न करता भारतातल्याच वस्तूंना प्राधान्य देण्याचा निर्णय व्यापार्यांनी घेतला आहे, अशी माहिती कॅटचे अध्यक्ष बी. सी. भरतिया आणि महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचा नारा दिल्याने आता मेड इन इंडियाला प्राधान्य दिले जाणार असल्याचे संकेत सरकारी संस्थांनीही दिले आहेत. सीमेवर शांतता ठेवण्याचे ठरलेले असतानाही चीनने भारताच्या सीमेजवळच युद्धाभ्यास करत पुन्हा एकदा चिथावणी देण्याचा प्रयत्न केला. या युद्ध सरावात क्षेपणास्त्रही डागण्यात आली असून त्याचा व्हीडीओ चीनच्या सरकारी ग्लोबल टाईम्सने व्हायरल केला आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून भारत-चीन सीमेवर प्रचंड तणाव आहे. चीनने अनेकदा भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. भारतीय सेनेने चीनचे सर्व प्रयत्न हाणून पाडले होते. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव कमी करण्यासाठी चर्चेच्या फेर्याही सुरू आहेत. मात्र आडमुठा चीन आपले धोरण बदलण्यास तयार नाही. याच पार्श्वभूमीवर चीनने तिबेटमध्ये युद्ध सराव केला आहे. चीनच्या पीपल्स आर्मीने ड्रोन्स आणि रॉकेट लाँचर्सच्या मदतीने आपल्या लक्ष्यांवर क्षेपणास्त्र डागलीत आणि त्यांना उद्ध्वस्त केले. यात वापरण्यात आलेली शस्त्रे ही ९0 टक्के नवी आहेत असेही त्यात म्हटलेले आहे.