शशी थरूर करताहेत पाकिस्तानात भारताची बदनामी

October 19,2020

नवी दिल्ली : १९ ऑक्टोबर - काँग्रेसचे नेते शशी थरूर यांच्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तानातल्या एका कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे बोलताना त्यांनी मोदी सरकारबद्दल जे वक्तव्य केले त्यावरून भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला. देश आणि सरकार कोरोनाविरुद्ध लढत असताना शशी थरून यांनी पाकिस्तानात भारताची बदनामी केली असा आरोप भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे.

पात्रा म्हणाले, शशी थरूर यांनी लाहोर थिंक फेस्टिव्हलमध्ये जे वक्तव्य दिले ते भारताची टिंगल-टवाळी करणारे होते. भारतात कोरोनाविरुद्ध लढताना नरेंद्र मोदी सरकारला अनेक आघाड्यांवर अपयश आल्याचे थरूर यांनी म्हटले होते.

पात्र म्हणाले, कोरोनाची स्थिती ज्या पद्धतीने पंतप्रधान मोदी यांनी हाताळली त्यावरून सर्व जग त्याचे कौतुक करत आहे. योग्य वेळी लॉकडाऊनचा निर्णय घेणे, ८0 कोटी गरीब लोकांना धान्याचा पुरवठा करणे आणि जगभरातल्या १५0 पेक्षा जास्त देशांना हाइड्रोक्सिक्लोरोक्वीनचा पुरवठा करणे असे अनेक निर्णय मोदी सरकारने घेतले आहेत. असे असतानाही थरूर हे भारताची बदनामी करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. पाकिस्तानातल्या एका कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांचे मित्र असलेल्या थरूर यांनी जे वक्तव्य केले त्यावरून काँग्रेस पक्षाची मानसिकता स्पष्ट होते असेही ते म्हणाले. सगळ्याच देशांमध्ये असहिष्णुता वाढीला लागली आहे. कुठल्याही समाजासाठी ही चांगली गोष्ट नाही. विविध मते आणि मतांतरे असलेल्या लोकांनी एकजिनसीपणे राहणे यातच सगळ्यांचे कल्याण आहे असे मतही शशी थरूर यांनी व्यक्त केले होते. थरूर यांच्या या वक्तव्यावरून भाजपने हल्लाबोल केल्याने राजकारण तापले आहे. थरूर यांनी याआधीही केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाले आहेत. भाजप आपल्या वक्तव्याचा विपर्यास करून राजकारण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप थरूर यांनी केला होता.