अंडाकरी न बनवल्याने संतप्त झालेल्या मित्रानेच केला मित्राचा खून

October 19,2020

नागपूर : १९ ऑक्टोबर - 'मी दारू आणणार तर तू अंडाकरी बनवशील,' असे दोघांत ठरले. मात्र, जाम दारू ढोसल्यावर दुसर्याने अंडाकरी बनवलीच नसल्याचे सांगितले. त्यामुळे भूक, दारू आणि रागाचा प्रचंड अंमल चढलेल्या कुख्यात गुंडाने मित्रालाच खल्लास केल्याची घटना मानकापूर हद्दीत समोर आली आहे. या प्रकरणाच्या तपासात खुन्यापर्यंत पोलिस पोहोचले आणि नेमका पळून जाण्याच्या तयारीत असतानाच त्याला बेड्या ठोकल्या. गौरव ऊर्फ निक्की शैलेंद्र गायकवाड रा. म्हाडा क्वॉटर्स, पिटेसूर रोड, गोधनी रेल्वे असे आरोपीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री मानकापूर पोलिसांना गोधनी रोडवरील श्रीकृष्ण ऑटो गॅरेजच्या बाजूला जखमी अवस्थेत एक व्यक्ती पडलेला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून जखमीला उपचारार्थ रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी मानकापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपासात मृताचे नाव बनारसी असल्याचे कळले. पोलिसांनी परिसरात त्याच्याबद्दल चौकशी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले. रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज पाहून बनारसी आणि त्याच्यासोबत असणार्या लोकांची माहिती काढण्यात आली. एका फुटेजमध्ये बनारसी आणि आरोपी निक्की हे दोघे सोबत जात असल्याचे पोलिसांना दिसले. त्यामुळे पोलिसांना निक्कीवर संशय आला. त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही. त्यामुळे बनारसीचा खून केल्यानंतर निक्की वस्तीतून पळून जात असल्याचा पोलिसांनी कयास बांधला. पोलिस तपासात कळाले की निक्की शनिवारी कपडे बदलून हाप पँट आणि टी शर्ट घालून गेल्याचे कळले. त्याने कपड्याची पिशवी भरून सायंकाळी गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानक गाठले होते. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी लगेच बसस्थानकावर सापळा रचला. तेथून आरोपी निक्की गायकवाडला ताब्यात घेण्यात आले. निक्की आधी भंडार्याला आणि त्यानंतर तो मध्यप्रदेशात पळून जाण्याच्या बेतात होता. निक्की हा कुख्यात गुंड असून त्याच्यावर २0१७-१८ मध्ये अवैधरित्या दारू विक्रीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती चौकशीअंती पोलिसांना मिळाली. बनारसी हा मजूर होता. निक्कीच्या संगतीत तोही दारूडा झाला होता. शुक्रवारी रात्री बनारसी आणि निक्कीने दारू पिण्याचा आणि अंडाकरी खाण्याचा बेत आखला. निक्कीने दारू आणणार असल्याचे तर बनारसीने अंडाकरी बनविण्याचे ठरले. निक्की दारू घेऊन आला. निक्की आणि बनारसी दोघेही रात्री साडेदहा वाजेपयर्ंत दारू पित बसले. त्यानंतर दोघांनाही भूक लागली. निक्कीने त्याला अंडाकरीबाबत विचारणा केली असता, बनारसीने अंडाकरी बनविली नसल्याचे सांगितले. उलट उकळलेली अंडी खाऊन टाकल्याचेही बनारसीने सांगितले. त्यामुळे निक्की अधिकच वैतागला. रागाच्या भरात त्याने बनारसीला दांड्याने मारहाण केली. आधीच दारूचा अंमल आणि त्यात राग यांमुळे त्याने दगडाने ठेचून बनारसीचा खून केल्याची कबुली दिली.