जम्मू काश्मीरचा उल्लेख चीनचा भूभाग असा थेट प्रक्षेपणात केला - नेटकऱ्यांची तक्रार

October 19,2020

नवी दिल्ली : १९ ऑक्टोबर - एका थेट प्रक्षेपणात जम्मू-काश्मीरचा उल्लेख टि्वटरने ‘चीनचा भूभाग’ असा केल्यानंतर नेटकर्यांनामध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून या प्रकरणाची तक्रार केंद्रीय विधि मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याकडे करण्यात आली आहे.

मायक्रोब्लॉगिंग संकेतस्थळ टि्वटरवर जम्मू-काश्मीर विषयक कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सुरू होते. मात्र, त्या कार्यक्रमात टि्वटरने जम्मू-काश्मीर प्रदेश हा चीनचा भूभाग म्हणून दाखविला. हा कार्यक्रम पाहणारे पत्रकार नितीन गोखले यांनी या संदर्भात टि्वट करून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याकडे तक्रार केली.

टि्वटरवर ‘हॉल ऑफ फेम फीचर’मध्ये लेह निवडल्यानंतर स्थळमध्ये ‘जम्मू-काश्मीर, पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना’ असे दाखविले जात असल्याची तक्रार नेटकर्यांनी केली. आपण दुसर्यांदा टि्वटरच्या या फीचरची तपासणी केली तेव्हा पुन्हा एकदा ‘जम्मू-काश्मीर, पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना’ पाहायला मिळाल्याचे गोखले यांनी सांगितले. अखेर त्यांनी केंद्र सरकारकडे यासंदर्भात तक्रार केली.

गोखले यांच्या या टि्वटला प्रतिसाद देताना इतर वापरकर्त्यांनी आपल्यालाही जम्मू काश्मीर हा चीनचा भाग असल्याचे दाखविले जात असल्याची तक्रार समाजमाध्यमांवर नोंदविली.

अशा प्रकारची चूक करण्याची टि्वटरची ही काही पहिलीच वेळ नाही. १९१२ मध्येही टि्वटरने जम्मू-काश्मीरला ‘पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना’चा भाग म्हटले होते. दरम्यान, युझर्सच्या तक्रारींची नोंद घेत टि्वटरच्या वरिष्ठ अधिकार्यांनी ही तांत्रिक चूक असल्याचे सांगत लवकरात लवकर ही चूक दुरुस्त करण्यात येईल, असे सांगितले.