मोबाईलवरून तलाक देणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल

October 19,2020

नागपूर : १९ ऑक्टोबर - हुंड्यासाठी छळणार्या नवर्याच्या पहिल्या लग्नाची माहिती उघड होताच दुसर्या बायकोला तलाक देणार्या नवर्याविरोधात मानकापूर पोलिस ठाण्यात दुसर्या बायकोच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हुसेन इसमाईल काखडची असे आरोपी पतीचे नाव आहे.

मानकापूर हद्दीतील शिर्डी कन्स्ट्रक्शन, क्रिष्णा पॅलेस, वेलकम सोसायटी, झिंगाबाई टाकळी येथे राहणार्या फिर्यादी रेश्मा हुसेन काखडची ऊर्फ रेश्मा असद खान (३२) यांचे १६ नोव्हेंबर २0१९ ला आरोपी हुसेन इसमाईल काखडची (४८) याच्यासोबत लग्न झाले होते. त्यानंतर काही दिवसातच सासू रशिदा इस्माईल काखडची ( ६३) रा. फ्लॅट नं. ११ बी, विंग २, २0/१२ आयबीएम रोड, पुणे, रेश्मा अजीज अडवाकर (वय ४९), अजीज अडवाकर (५0) दोन्ही रा. एमआयजी कॉलनी, बिल्डिंग नं.२, चवथा माळा, कुर्ला, मुंबई यांनी रेश्मा काखडची यांचा हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. रेश्माला लग्नामध्ये मिळालेले २५ लाखांचे स्त्रीधन आरोपी सासू रशिदा काखडची व रेश्मा अडवाकर यांनी स्वत:जवळ ठेवून घेतले. काही दिवसानंतर आरोपी हुसेन काखडची याचे पहिले लग्न झालेले असल्याचे रेश्मा यांना कळले. आरोपी हुसेन काखडचीने रेश्माच्या घरातील लोकांना याची माहिती न देता बेकायदेशीर पद्धतीने दुसरे लग्न केले. तसेच आरोपी हुसेन काखडची याने भारताचे नागरिक असल्याचे खोटे कागदपत्र बनवून फिर्यादी आणि त्याच्या माहेरच्या लोकांना खोटी माहिती दिली. आरोपी हुसेन काखडची याने लग्नामध्ये नगदी १0 लाख रुपये, सोन्याचे दागिने, हुंडाही घेतला होता. त्याच्याबद्दलची खरी माहिती रेश्माला कळताच हुसेन याने ११ सप्टेंबर २0२0 ला रेश्माला बेकायदेशीर तलाक दिला.