अनलॉक-५ नंतर बाजारात उत्साहाचे वातावरण

October 19,2020

नवी दिल्ली : १९ ऑक्टोबर - कोरोना काळात अर्थव्यवस्थेला काहीशी मरगळ आली असली तरी आता मोकळीक-५ नंतर, तसेच केंद्राने केलेल्या विविध आर्थिक उपायोजनांमुळे बाजारात पुन्हा उत्साह परतत आहे.

देशभरातील खरीददार दुकानाचा उंबरठा ओलांडू लागले आहेत. व्यवसाय कोरोनाच्या आधीच्या काळातील तुलनेत ६० टक्केपर्यंत गेला आहे. दीपावलीत परिस्थिती आणखी चांगली होईल. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या (कॅट) अंदाजानुसार लोकांनी गेल्या सात महिन्यांत मोठ्या प्रमाणावर खर्चकपात केली. त्यामुळे देशात लोकांची अंदाजे दीड लाख कोटी रुपयांची बचत झाली. नवरात्रीपासून दिवाळीपर्यंत एका महिन्यात १ लाख कोटी रुपयांची खरेदी होईल. यात वाहन, सोने व गृहोपयोगी वस्तूंचा समावेश आहे. तज्ज्ञांच्या मते रिअल इस्टेटमध्ये अंदाजे ३० हजार कोटी रुपयांची खरेदी होईल.

सात महिन्यांत लोकांनी गरजेपुरती खरेदी केली. पण, दसरा-दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणांना लोक खरेदी करतील, असे कॅटचे अध्यक्ष बी. सी. भरतीया यांनी सांगितले. ३१ मार्च २०२१पर्यंत बाजारात २ लाख कोटी रुपयांचे व्यवहार होतील, असा अंदाजही कॅटने व्यक्त केला आहे.

ऑल इंडिया इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनचे अध्यक्ष मितेश मोदी म्हणाले, दिवाळीत गत वर्षाच्या तुलनेत टीव्ही, टॅब, भ्रमणध्वनी इत्यादी वस्तूंची २० ते ३० टक्के जास्त विक्री होण्याची शक्यता आहे. कोरोना महामारीला पूर्णपणे प्रतिबंध न झाल्याने येणार्या महिन्यांतही घरात मनोरंजन उपकरणांसह राहावे लागले तर मोठा दूरचित्रवाणी संच हवा, असे लोकांना वाटत आहे.

व्हीमार्टचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ललित अग्रवाल म्हणाले, या संकटाच्या काळातही गेल्या दिवाळीच्या तुलनेत यंदा वस्त्रप्रावरणांची विक्री ८० ते ९० टक्के होईल. दिवाळीच्या खरेदीवर ग्रामीण मानसिकतेचा विशेष परिणाम होतो. यंदा शेतकर्यांना चांगले उत्पन्न मिळाले आहे. त्याचा शहरी खरेदीवर चांगला परिणाम दिसेल. केंद्र सरकारच्या एलटीसी व्हाऊचर योजनेचाही फायदा होईल.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे एस. के. जिंदल व पृथ्वीराज कोठारी म्हणाले, दिवाळीत सराफा बाजारात उत्साह असेल. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत या दिवाळीला वजनाचा विचार करता केवळ ७० ते ८० टक्के सोन्याची विक्री होईल. पण, मूल्यस्वरूपात ती मागील दिवाळीच्या तुलनेत कमी-अधिक असेल. लोक दागिन्यांऐवजी लगडी व बिस्किटे खरेदी करतील.

फ्लिपकार्ट, ऍमेझॉन, स्नॅपडीलसारख्या ई-कॉमर्स संकेतस्थळावर वार्षिक सणासुदीची विक्री सुरू आहे. रेडशीट सल्लागार संस्थेच्या सप्टेंबरमधील अहवालानुसार, या वर्षी दिवाळीला ५१ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खरेदी होईल. ती मागील वर्षातील दिवाळीच्या तुलनेत दुप्पट असेल.