मुशाफिरी माहिती अधिकाराची या पुस्तकाचे ऑनलाईन प्रकाशन

October 19,2020

नागपूर : १९ ऑक्टोबर - माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांचे ‘मुशाफिरी माहिती अधिकाराची’ या पुस्तकाचे प्रकाशन ऑनलाइन पद्धतीने झाले. प्रसिद्ध साहित्यिक डॉ. श्रीपाद जोशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. माहिती अधिकाराची व्यापकता समजून घेऊन प्रामाणिक कार्यकर्त्यांची आज नितांत गरज आहे. अनेक वर्षे सामान्य माणसाने प्रश्नच न विचारल्यामुळे आज सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची हानी झालेली आहे. त्यामुळेच अभय कोलारकरां सार‘या कार्यकर्त्यांच्या पुस्तकाला महत्व आहे असे अध्यक्षीय भाषणात डॉ. जोशी यांनी सांगितले.

प्रमुख वक्ते म्हणून वरिष्ठ पत्रकार अविनाश महालक्ष्मे आणि माहिती अधिकार क्षेत्रातील जाणकार अविनाश प्रभुणे उपस्थित होते. माहिती अधिकाराची सकारात्मक बाजू अभय कोलारकारांनी मांडली असून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली असल्याचे अविनाश महालक्ष्मे यांनी सांगितले. माहिती अधिकाराच्या क्षेत्रातील एका कार्यकर्ते चे अनुभव प्रथमच समोर येत असून यामुळे या चळवळीला सकारात्मक पाठिंबा मिळेल असे अविनाश प्रभुणे यांनी सांगितले. माहिती अधिकार कार्यकर्ते संजय थूल यांनी पुस्तकाला शुभेच्छा दिल्या. माहिती अधिकाराच्या क्षेत्रातील ही मुशाफिरी फक्तच चांगल्या गोष्टींना समोर आणण्यासाठी केली आणि राजकारणविरहित ठेवली त्यामुळे सामान्यांना ती जवळची वाटली असे आपल्या मनोगतात अभय कोलारकर यांनी सांगितले. पुस्तक संपदानासंबंधी सोनाली कोलारकर-सोनार यांनी भूमिका विशद केली. कार्यक‘माचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन कल्याणी कोलारकर यांनी केले.