महामार्गावर साचले पाणी, रस्त्याची झाली नदी

October 19,2020

वाशीम : १९ ऑक्टोबर - मंगरुळनाथ शहरातील आठवडी बाजारासमोरील रोडवरील आर्णी-अकोला महामार्गावर कंत्राटदाने चुकीच्या पद्धतीने रस्ता बांधकाम केल्यामुळे पावसाचे पाणी साचले व रस्त्याला तलावाचे स्वरुप आल्याने वाहतूक अडथळा निर्माण होत आहे.

सदर महामार्ग रस्ता हा क्रॉक्रेटीकरण असून शहरातील रस्त्यााच्या दोन्हीही बाजूला नाली बांधलेली आहे. नाली ही रस्त्यापेक्षा उंच असून वरून बंद केलेली आहे. सतत होत असलेल्या मुसळधार पावसाचे पाणी शहरातील पाणी नालीमध्ये न जाता परत रोडवर जमा झाल्यामुळे रस्त्यावर नदी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे नागरिकांना खोल पाण्यातून ये-जा करावी लागत असून, केव्हाही या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व बाबीकरिता सदर कंत्राटदार जवाबदार असल्याचे दिसून येत आहे.शहरातील व मानोराकडे जाणार्या वाहन धारकांना रस्ता शोधतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या सर्व प्रकारास सदर रस्ता कंत्राटदार व रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी जवाबदार असल्याचा आरोप होत आहे.

 शहराच्या अंतर्गत भागातील वाहुन जाणारे पाणी महामार्ग रस्त्याच्या नालीत काढणे गरजेचे होते. मात्र, सबंधित ठेकेदाराने थातुरमातुर नालीचे काम केले व रस्त्यावरील पाण्याचा उतार नालीत न काढल्यामुळे पावसाळ्यात सदर परिसरातील दुकानात व आठवडी बाजारात पाणी घुसून दुकांदारांचे ही नुकसान होऊ शकते. याबाबीची गंभीर दखल जिल्हाधिकारी वाशीम यांनी घेऊन कंत्राटदार व जवाबदार अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी शहरातील नागरिक करीत आहेत.