वाघाच्या हल्लयाने गुराखी जखमी

October 19,2020

चंद्रपूर : १९ ऑक्टोबर - गुरे चराईसाठी गेलेल्या गुराख्याला वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना दुपारी दीड वाजताच्या सुमारास शिवणी वनपरिक्षेत्रातील वासेरा बिटातील कक्ष क्रमांक 570 मध्ये घडली. तेजराम किसन नागापूरे असे जखमीचे नाव आहे.

शिवणी वनपरिपरिक्षेत्रात मोठया प्रमाणात वन्य हिस्त्र प्राण्याचा वावर असून,वाघ, बिबट या हिंसक प्राण्याचे नियमित नागरिकाना दर्शन घडत असते. तसेच दरवर्षी वाघ हल्ल्याच्या घटना नियमित घडत आहेत. वाघाच्या हल्लयात ठार झाल्याच्याही घटना घडल्या.

दुपारच्या सुमारास वासेरा गाव परिसरातील जंगल परिसरात गुरे चराईसाठी गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करून जखमी केले. लगतच्या अन्य गुराख्यांनी आरडाओरड केल्याने वाघ जंगलाच्या दिशेने पळाला. माहिती मिळताच वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली. पंचनामा करून जखमीला सिंदेवाही ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार करून त्यांना चंद्रपूर जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. दिवसेदिवस वाघांचा वावर गाव परिसरात आढळून येत असल्यामुळे भितीचे वातावरण निर्माण होत असते. वाघांचे हल्ले टाळण्यासाठी वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली.