वीज पडल्याने एक बालिका आणि एका शेतकऱ्याचा मृत्यू

October 19,2020

वर्धा : १९ ऑक्टोबर - दुपारी विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने हिंगणघाट तालुक्यातील सेलू शिवारात वीज पडल्याने पाच वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. तर दुसर्या घटनेत देवळी तालुक्यातील नांदोरा डफरे गाव शिवारात शेतात काम करीत असलेल्या २८ वर्षीय शेतकर्याचा मृत्यू झाला.मरण पावलेल्यांत नांदोरा डफरे येथील शेतकरी प्रशांत किसनाजी ड.फरे (वय २८) आणि सेलू येथील ईश्वरी गणेश बोरकर (वय ५) यांचा समावेश आहे.

नांदोरा डफरे येथील शेतकरी प्रशांत डफरे हे शेतातील बैल घरी आणण्यास शेतात गेले होते. काल दुपारी साडेचार वाजताच्या दरम्यान या परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यातच विजांचा कडकडाट होत प्रशांतच्या अंगावर वीज पडली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. रात्रभर त्यांचा मृतदेह शेतातच पडून होता. त्यांचा शोध घेतला असता त्यांचा मृतदेह मिळाला. काही दिवसांपूर्वीच प्रशांतच्या वडिलांचा मृत्यू झाल्याने त्यांनी शेतातील काम करायला सुरुवात केली होती. अखेर त्यांचाही मृत्यू झाला.

तर हिंगणघाट तालुक्यातील सेलू शिवारात वीज पडल्याने पाच वर्षीय बालिकेचा शेतातच मृत्यू झाला. मरण पावलेल्या बालिकेचे नाव ईश्वरी गणेश बोरकर आहे. आई वडील शेतातल्या कामाकरीता गेल्याने ती आईवडिलांसोबत शेतात गेली होती. तिचे आई वडील शेतमजूर आहेत.