संपत्तीच्या वादातून सावत्र भावाने केला भावाचा खून

October 19,2020

यवतमाळ : १९ ऑक्टोबर - वडिलोपार्जित असलेल्या घराच्या वादातून भावा भावाच्या भांडणाचे  रूपांतर खुनात झाले आहे. ही घटना काल रात्रीच्या दरम्यान घडली असून, सावत्र भावाने भावाचा दगडी फरशी डोक्यात घालून जखमी केले व गळ्यावर छातीवर धारदार शस्त्राने सपासप वार करून जागीच ठार मारले. यात मृतकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतकाचे नाव गजानन बालाजी काळे (३९) रा. गणेश वार्ड असे आहे. तर आरोपीचे नाव मारुती ऊर्फ बजरंग बालाजी काळे (३६) रा. शिवाजी वॉर्ड असे आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काळे बंधूचे गणेश वार्ड येथे वडिलोपार्जित घर आहे.या घराच्या ताब्या वरून नेहमीच भावाभावात भांडणे होत होती.

सध्या या वडिलोपार्जित घरांमध्ये राजेश बालाजी काळे हा राहत होता. दोन दिवसांपूर्वी मृतक गजानन हा कुराड घेऊन तेथे आला व त्याने राजेश सोबत घरावरून वाद घातला दरम्यान शिवाजी वार्डातील रहिवासी व मुख्य आरोपी बजरंग बालाजी काळे याने तात्पुरती मध्यस्थी करून सदर घर विकून आपण तिघे जण पैशाची वाटणी करून घेऊ असे सांगून वेळ मारून नेली व तात्पुरता वाद मिटविला.

परंतु काल रात्रीच्या दरम्यान राजेश घरात झोपून असताना बजरंगच्या मनात असलेली खुमखुमी अखेर त्याने घरासमोर बसलेल्या गजानन याचेवर दगडी फरशी मारून जखमी केले व त्यानंतर मानेवर व छातीवर धारदार शस्त्राने वार करून जागीच ठार मारले. मारहाण बाबतची माहिती सकाळी शहर पोलिस स्टेशनला लागताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले.

याबाबतची फिर्याद मृतकाची प्रियसी सावित्री शेषराव राऊत (४५) रा.जोशीपुरा शहर पोलीस स्टेशनला दिली. आरोपी मारुती बजरंग काळे यास अटक करण्यात आली असून पुढील तपास शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार पांडुरंग फाडे करीत आहे