काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी जनतेच्या प्रश्नासाठी संघर्ष करावा - सोनिया गांधी

October 19,2020

नवी दिल्ली : १९ ऑक्टोबर - लोकशाही सध्या कठीण काळातून जात असल्याने पक्षाच्या नेत्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करावा, असे आवाहन काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रविवारी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस आणि राज्यांचे प्रभारी यांच्या बैठकीत केले. दलितांवर होणारे अत्याचार आणि कृषी विधेयकांविरोधात करावयाच्या निदर्शनांबाबत या बैठकीत चर्चा झाली.

लोकशाही सध्या कठीण काळातून जात असल्याने प्रत्येकाने जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष करावा आणि त्यांचे क्लेश दूर करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन सोनिया गांधी यांनी केल्याचे पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्वीट केले आहे. सोनिया गांधी यांनी बैठकीत सरकारवर कोविड-१९, कृषी विधेयकांवरून जोरदार हल्लाही चढविला.

बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक होत असून मध्य प्रदेशातील विधानसभेच्या २८ जागांसह विविध राज्यांमध्ये पोटनिवडणुका होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर सोनिया गांधी यांनी केलेल्या आवाहनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

केंद्र सरकारच्या शेतकरी आणि महिलाविरोधी, गरीबविरोधी आणि जनताविरोधी धोरणांविरुद्ध कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे बैठकीनंतर पक्षाचे नेते के. सी. वेणुगोपाळ यांनी सांगितले. काँग्रेस   सातत्याने  सरकारच्या कारभाराबाबत प्रश्न उपस्थित करीत आहे.