कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्रात काही शब्द टाळायला हवे होते - अमित शाह

October 19,2020

नवी दिल्ली : १९ ऑक्टोबर - महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी अलीकडेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं पत्र वादग्रस्त ठरलं. या मुद्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाष्य केलं आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आपल्या शब्दांचा अधिक चांगल्या पद्धतीने वापर करु शकले असते असे अमित शाह म्हणाले.

‘तुम्ही धर्मनिरपेक्ष झालात का?’ असा प्रश्न कोश्यारी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात विचारला होता. अमित शाह यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. 

कोश्यारी यांच्या पत्राकडे पक्ष कुठल्या दृष्टीकोनातून पाहतो, असा प्रश्न अमित शाह यांना विचारण्यात आला. त्यावर अमित शाह म्हणाले की, “मी पत्र वाचले आहे. त्यांनी काही शब्द टाळले असते, तर बर झालं असतं. त्यांनी ते विशेष शब्द टाळायला पाहिजे होते”

दोन दिवसांपूर्वीच राज्यातील मंदिरं बंद असण्याच्या मुद्द्यावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं. एकीकडे सरकार बार, रेस्टॉरंट खुले करत आहेत. तर देवीदेवतांना मात्र अजूनही लॉकडाउनमध्येच ठेवलं आहे. मागील तीन महिन्याच्या काळात अनेक शिष्टमंडळांनी या संदर्भात माझी भेट घेतली आहे. तुम्ही हिंदुत्वाचे कट्टर समर्थक आहात. तुम्ही हे सार्वजनिकरित्या मान्यही करता. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तुम्ही अयोध्येलाही गेला होता.

तुम्ही पंढरपूरला जाऊन विठ्ठल रुक्मिणीची पूजा केली. अनेक राज्यात मंदिर खुली करण्यात आली असून, महाराष्ट्रातही करोना मार्गदर्शक सूचनाची अमलबजावणी करून मंदिर खुली करण्यात यावी अशी मागणी या पत्रात करण्यात आली होती. या पत्राला उद्धव ठाकरे यांनी दिलेलं उत्तरही चांगलंच गाजलं होतं. माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नाही मी मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचे हसून स्वागत करत नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी या पत्राला उत्तर दिलं होतं.