मेडिकल मधून उपचारादरम्यान कैदी पळाला

October 19,2020

नागपूर : १९ ऑक्टोबर - नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील एक कैदी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (मेडिकल) येथून पळून गेला आहे. बंबईया उर्फ अब्बास इकबाल अली असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर वर्धा येथील एका इसमाच्या खुनाचा आरोप आहे. तो गेल्या वर्षभरापासून नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात बंद होता. मात्र रविवारी त्याची प्रकृती खराब झाल्यानंतर त्याला मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याच वेळी संधीचा गैरफायदा घेऊन बंबईया उर्फ अब्बास इकबाल अली पळून जाण्यास यशस्वी झाला आहे. या घटनेची माहिती पुढे येताच पोलीस प्रशासन आरोपीला शोधण्याच्या कामाला लागले आहे. मात्र अद्याप त्याचा पोलिसांना कोणताही सुगावा लागलेला नाही. 

बंबईया उर्फ अब्बास इकबाल अली हा मूळचा नागपूर शहरातील ताजबाग परिसरात राहणार आहे. वर्धा शहरातील एका इसमाच्या खुनाच्या गुन्ह्यात त्याला अटक झाल्यानंतर त्याला नोव्हेंबर २०१९ मध्ये नागपुरच्या मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले होते. रविवारी अचानक त्याची प्रकृती बिघडल्यानंतर त्याला कारागृहातील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी मेडिकल रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिल्यानंतर कारागृहातील कर्मचारी त्याला घेऊन रुग्णालयात गेले असताना सुरक्षा राक्षकांचे लक्ष चुकवून आरोपी पळून गेला. या घटनेमुळे संपूर्ण मेडिकल रुग्णालयात खळबळ माजली होती. त्यानंतर अजनी पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी दोन पथके रवाना केली आहेत