क्रिकेट असोसिएशन मधील कथित गैरव्यवहार प्रकरणात फारुख अब्दुल्लांची ईडी कडून चौकशी सुरु

October 19,2020

श्रीनगर : १९ ऑक्टोबर - जम्मू-काश्मीर क्रिकेट असोशएशनमधील कथित गैरव्यवहाराशी निगडीत एका प्रकऱणात माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला हे आज अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर झाले आहेत. ईडीचे पथक श्रीनगर येथील आपल्या कार्यालयात त्यांची चौकशी करत आहे. या अगोदर देखील फारुख अब्दुल्ला यांना याप्रकरणी ईडीने बोलावले होते.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, पूर्वीप्रमाणे पीएमएलए अंतर्गत अब्दुल्ला यांचा जवाब नोंदवला जाईल. ईडीने सीबीआयच्या पुढाकारानंतर या प्रकरणाची नोंद करून घेतली आहे. सीबीआयने जेकेसीएचे सरचिटणीस मोहम्मद सलीम खान आणि माजी कोषाध्यक्ष एहसान अहमद मिर्जासह अन्य पदाधिकाऱ्यांविरोधात आरोप केले होते.

जम्मू-काश्मीर क्रिकेट असोशिएशनला बीसीसीआयने २००२ पासून २०११ दरम्यान क्रिकेट सुविधांच्या विकासासाठी दिलेल्या ११२ कोटी रुपयांपैकी ४३.४९ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी जेकेसीए अध्यक्ष फारुख अब्दुल्ला, सरचिटणीस मोहम्मद सलीम खान, कोषाध्यक्ष एहसान अहमद मिर्जा आणि बशीर अहमद मिसगर यांच्या विरोधात षडयंत्र रचल्याचा व नियमांचे उल्लंन केल्याचा आरोप करत, आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

नॅशनल कॉन्फरन्सचे प्रवक्त्यांनी यावरून प्रतिक्रिया देताना म्हटले की, ईडीचे पत्र गुपकार घोषणापत्रानंतर आले आहे. हे स्पष्ट आहे की काश्मीर पीपल्स अलायन्सच्या निर्मितीनंतरचे हे राजकारण म्हणजे सूड भावनेतून केलेली कारवाई आहे. असं काही होईल, याची आम्हाला कल्पना होती. केंद्रातील सत्ताधारी भाजपा नव्या आघाडीशी लढण्यासाठी या संस्थांचा वापर करत आहे. कारण, राजकीयदृष्ट्या ते लढू शकत नाहीत.