लडाख मध्ये भारतीय लष्कराने घेतले चिनी सैनिकाला ताब्यात

October 19,2020

लडाख : १९ ऑक्टोबर - लडाखच्या डेमचॉक भागातून भारतीय लष्कराने चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या एका सैनिकाला ताब्यात घेतले आहे. भारतीय सैनिकांनी पीएलएच्या सैनिकाला पकडले, तेव्हा त्याच्याकडे नागरी आणि लष्करी कागदपत्रे होती. 

हा चिनी सैनिक झीजियांग प्रांताचा रहिवाशी आहे. वँग या लाँग असे या सैनिकाचे नाव आहे. त्याच्याकडे लष्करी आणि नागरी कागदपत्रे होती. शस्त्रास्त्रे दुरुस्त करण्याचे काम तो करतो. पीएलचा हा सैनिक हेरगिरीच्या मोहिमेवर होता का? त्याचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत. प्रस्थापित शिष्टाचार आणि प्रक्रियेनुसार या सैनिकाला पुन्हा चीनला सोपवण्यात येईल असे सूत्रांनी सांगितले.

उंचावरील प्रतिकुल वातावरणामुळे या सैनिकाला ताब्यात घेतल्यानंतर वैद्यकीय सहाय्य करण्यात आले. त्याला ऑक्सिजन, अन्न आणि उबदार कपडे देण्यात आल्याचे सैन्याकडून सांगण्यात आले. बेपत्ता असलेल्या सैनिकाबाबत पीएलएकडूनही विनंती करण्यात आली होती. प्रस्थापित शिष्टाचारानुसार, सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चुशूल-मोल्डो येथे या सैनिकाला पुन्हा चीनकडे सोपवले जाईल, असे सैन्याकडून सांगण्यात आले.